नांदेड : जी व्यक्ती चांगला श्रोता असते तीच व्यक्ती चांगला वक्ता होऊ शकते़ कलावंत हा चांगला माणूस असावा लागतो आणि माणूसपणा येण्यासाठी समोरच्या व्यक्तीचे ऐकून घेण्याची क्षमता अंगी असावी लागते, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाट्यलेखक, दिग्दर्शक ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केले़ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा नांदेड, कलामंदिर ट्रस्ट आणि तन्मय ग्रुपच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते़ शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ़ पंडित विद्यासागर तर प्रमुख पाहुणे म्हणून अ़ भा़ म़ नाट्य परिषद शाखा नांदेडचे अध्यक्ष संजीव कुळकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती़ कुलगुरू डॉ़ विद्यासागर म्हणाले, माणूस कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असला तरीही त्याला खरा आनंद मिळतो तो त्याची कलावंत म्हणून ओळख सांगितली जाते तेव्हाच़ प्रास्ताविक नाथा चितळे तर सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले़ यशस्वीतेसाठी रेणुका पार्डीकर, सुमेध महाजन, अविनाश बोबडे, अमोल काळे, सोनल देलमाडे, नकुल उपाध्याय, सचिन जोशी, सचिन गायकवाड, सुमित यादव, राहुल साखरे, नितीश देशपांडे, श्वेता चौले, आनंद जाधव, समित गोखले, बाबू सारंगधर आदींनी परिश्रम घेतले़ (प्रतिनिधी)
कलावंत चांगला माणूस असावा लागतो- गायकवाड
By admin | Updated: August 31, 2014 00:14 IST