सोयगाव : पाणीपुरी विक्रेत्यास मारहाण करणाऱ्या युवकाला समजावण्यास गेलेले शिवसेना शहरप्रमुख गजानन चौधरी यांच्यावर विळ्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला, तसेच घटनास्थळी पोलीस आल्यावर त्यांच्यावरही हल्ला करून संबंधित आरोपीने पोलिसाचे कपडे फाडल्याची घटना घडली आहे. सोयगावात तणाव निर्माण झाला असून आरोपीला गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. येथील जुना बाजार चौक परिसरात पाणीपुरी विक्रेता आणि संजय भोजराज दंदराळे (ह.मु. भवानीनगर, सोयगाव) यांच्यात वाद झाला. संजयने पाणीपुरी विक्रेत्यास बेदम मारहाण केली. हे भांडण सोडविण्यास गेलेले सेना शहरप्रमुख चौधरी यांच्यावरही संजयने पाठीमागून विळ्याने वार केला. यात ते गंभीर जखमी झाले, तसेच संजयने दगडफेक केल्याने विजय काळे यांच्या हाताला मार लागला आहे. दरम्यान, चौधरी पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संजयला ताब्यात घेताना त्याने पोलिसांसोबतही वाद घातला. त्यांच्यात झटापट झाली. यात पोलिसाचे कपडे फाडण्यात आले. शेवटी त्याचे हात-पाय बांधून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राम मांडुरके यांनी घटनास्थळी भेट दिली. (वार्ताहर)संजय तडीपारीतील आरोपी ? संजय दंदराळे हा जोगेश्वरी मुंबई येथील रहिवासी असून त्याला मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. तो तडीपार असल्याचे बोलले जाते, मात्र पोलिसांनी याला दुजोरा दिला नाही. मामाकडे आल्याचे समजते. याप्रकरणी फौजदार एस.आर. भांडवले, जमादार बाजीराव धनवट, संतोष जिभोले पुढील तपास करीत आहेत.
सेना शहरप्रमुखावर हल्ला
By admin | Updated: August 25, 2014 00:24 IST