नांदेड : योजना पुनर्रचना व बळकटीकरणअंतर्गत कार्यरत अंगणवाडी केंद्रासाठी अतिरिक्त सेविका अर्थात दुसरी कार्यकर्ती नेमल्या जाणार आहे़ जिल्ह्यातील ३ हजार १० अंगणवाड्यांमध्ये अतिरिक्त सेविका अर्ज दाखल करण्यासाठी २५ आॅगस्ट ही अंतिम मुदत होती, अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी दिली़ केंद्र शासनाकडून योजना पुनर्रचना व बळकटीकरण योजनेसाठी राज्यातील २० जिल्ह्यांची प्रयोगिक तत्वावर निवड करण्यात आली आहे़ त्यात नांदेडसह हिंगोली, पररभणी, जालना, बीड, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, बुलडाणा, वाशिम, नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, मुंबई आणि सांगली जिल्ह्याचा समावेश आहे़ त्याअंतर्गत जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांकरिता स्थानिक पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते़ अतिरिक्त सेविका ही मानधन तत्वावर केंद्रशासनाकडून देय असलेल्या अनुदानावर तात्पुरत्या स्वरूपात नेमली जाणार आहे़ त्यांची निवड ही कोणत्याही निवड समितीकडून केली जाणार नाही़ केवळ पात्रतेच्या अटीनुसार गुणवत्ता व इतर नैसर्गिक गुणांच्या आधारे निवड केली जाईल़ अंगणवाडी सेविकांसाठी किमान १० वी पासची अट ठेवण्यात आली आहे़ तसेच स्थानिक रहिवासी असावी, २१ ते ३० वर्ष वयोगटातील आणि दोन जिवंत अपत्यांपेक्षा जास्त अपत्ये नसली पाहिजेत असेही स्पष्ट करण्यात आले आहे़ अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज करण्याची सोमवारी अंतिम मुदत होती़ त्यामुळे महिला व बालविकास विभागाच्या नांदेड तालुका कार्यालयासह अन्य तालुका कार्यालयातही महिलांनी मोठी गर्दी केली होती़ (प्रतिनिधी)
तीन हजार अंगणवाडीमध्ये अतिरिक्त सेविकांची होणार नियुक्ती
By admin | Updated: August 26, 2014 00:42 IST