हिंगोली : अधिकाऱ्यास अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ व मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने आरोपी गणपत हरिबा चव्हाण (रा. हिंगोली) यास सुनावलेली दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. १३ आॅगस्ट रोजी न्यायालयाने हा निकाल दिला.हिंगोली येथील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील सहाय्यक भुवैज्ञानिक रविंद्र शेलार हे ९ आॅक्टोबर २००६ रोजी रात्री ८.३० वाजता जिल्हाधिकाऱ्यांना पाणी पुरवठ्या संबंधी माहिती देण्यासाठी आपल्या कार्यालयात काम करीत होते. त्याच कार्यालयातील वाहनचालक गणपत हरिबा चव्हाण याने त्या ठिकाणी परवानगीशिवाय जावून शेलार यांना अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच ‘आॅफीस काय तुझ्या बापाचे आहे का?’ असे म्हणून शर्टाची कॉलर पकडून तोंडावर बुक्क्याने मारहाण केली व शेलार यांना खुर्चीतून उठू दिले नाही. सेवक भांडण सोडविण्यास गेला असता त्यालाही धमकावले. या प्रकरणी रवींद्र शेलार यांच्या फिर्यादीवरून आरोपी गणपत चव्हाण याच्याविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा खटला हिंगोली येथील प्रथमवर्ग न्यायालयात चालला. त्यात आरोपी चव्हाण यास शिक्षा सुनावण्यात आली होती. या निर्णयाविरुद्ध आरोपीच्या वतीने ४ एप्रिल २००९ रोजी जिल्हा न्यायालयात अपिल दाखल करण्यात आले. सदरील अपिलात १ आॅगस्ट रोजी तर्द्थ अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधिश पी.आर. रघुवंशी यांच्यासमोर युक्तीवाद झाला. यात सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड. ज्ञानदेव टेकनुर यांनी बाजू मांडली. या प्रकरणात दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकुण घेतल्यानंतर १३ आॅगस्ट रोजी न्या. रघुवंशी यांनी आरोपी गणपत चव्हाण याचे अपिल खारीज करून कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली शिक्षा कायम ठेवली. (प्रतिनिधी)नेमकी काय होती शिक्षा?अधिकाऱ्यास शिवीगाळ व मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणला होता.३० मार्च २००९ रोजी या खटल्याचा निकाल कनिष्ठ न्यायालयाने दिला होता.न्यायालयाने आरोपी गणपत हरिबा चव्हाण (चालक, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, रा. जि. प. कर्मचारी वसाहत, हिंगोली) यास कलम ३३२ भादंविनुसार २ वर्षे सश्रम कारावास व १०० रुपये दंड, कलम ३५३ नुसार १ वर्षे सश्रम कारावास व १०० दंड, कलम ३४१ नुसार १ महिना सश्रम कारावास व १०० रुपये दंड, कलम ५०६ भादंवि अन्वये ६ महिने साधा कारावास व १०० रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली होती.
अपील खारीज; शिक्षा कायम
By admin | Updated: August 15, 2014 00:04 IST