औरंगाबाद : अभियांत्रिकी विद्याशाखेच्या उत्तरपत्रिकांना आॅक्टोबरपासून ‘बारकोड’ लावण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी घेतला आहे. पहिल्या टप्प्यात अभियांत्रिकी विद्याशाखेचा हा प्रायोगिक तत्त्वावर घेतलेला निर्णय यशस्वी झाल्यास पुढे सर्व विद्याशाखांना ‘बारकोड’ पद्धत अवलंबिली जाणार आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचा विद्यापीठात १०० दिवसांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यासंदर्भात त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, सर्व अधिकार मंडळांचे सदस्य, सर्व पदाधिकारी व अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे चांगले सहकार्य मिळत आहे. विद्यापीठाच्या विकासासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. येथे विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधनाचे काही प्रश्न आहेत. ते समजून घेतले. काय करता येईल, त्याचा अभ्यास केला व निर्णय घेतले. अभियांत्रिकीची परीक्षा आणि निकालाबाबत थोडी ओरड झाली. त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. यापुढे निकाल वेळेत लावण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. उत्तरपत्रिका तपासण्यासाठी प्राध्यापकांनी सहकार्य करायला पाहिजे. जे प्राध्यापक या कामास नकार देतील, त्यांना नोटिसा बजावल्या जातील. आता प्रायोगिक तत्त्वावर अभियांत्रिकीच्या उत्तरपत्रिकांना ‘बारकोड’ लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आॅक्टोबरपासून हा निर्णय अंमलात आणला जाईल. त्यानंतर सर्वच विद्याशाखांसाठी ‘बारकोड’ पद्धत लागू केली जाईल. विज्ञान व सामाजिकशास्त्रे विभागातून प्रत्येकी ४ याप्रमाणे एकूण ८० कोटींचे ८ संशोधन प्रस्ताव नुकतेच यूजीसीकडे सादर करण्यात आले आहेत. शिवाय व्यक्तिगत २० कोटींचे प्रस्ताव यूजीसी व विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. गरजेनुसार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील. सध्या विद्यापीठ परिसरात २४० सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. त्यानंतर २०११ पासून बंद पडलेली ‘गोल्डन ज्युबिली फेलोशिप’ ही सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आल्याचे कुलगुरू डॉ. चोपडे म्हणाले.
अभियांत्रिकी विद्याशाखेच्या उत्तरपत्रिकांना आता ‘बारकोड’
By admin | Updated: September 16, 2014 01:36 IST