लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भागीदारांना २७ कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आर. के. कॉन्स्ट्रोचा मालक बिल्डर समीर मेहताविरुद्ध शनिवारी (दि.२) आणखी एक फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. यापूर्वी मेहताविरुद्ध सिडको, क्रांतीचौक आणि एमआयडीसी सिडको ठाण्यात फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद आहे.मेहताने हिरापूर येथील आर. के. फोर्थ डायमेंशन या गृहप्रकल्पाची जाहिरातीतून माहिती दिली होती. ही जाहिरात वाचून टिळकपथ येथील प्रवीण नंदकुमार पारीक (४२) यांच्यासह त्यांचे भाऊ संजीव पारीक हे हिरापूर येथील गृहप्रकल्प पाहणीसाठी गेले. तेव्हा बांधकाम सुरू झाले नव्हते. मेहताच्या प्रतिनिधीने त्यांना प्रकल्पात उद्यान, आर. ओ. कनेक्शन, गजेबो हॉल, पार्टी लॉन्स, जिमखाना आणि फंक्शन हॉल, अशा सुविधा देणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे ते आरोपीच्या भाग्यनगरमधील कार्यालयात गेले. यानंतर गृहप्रकल्पातील इमारत क्र. १३ मधील २ बीएचके फ्लॅट क्र.४ हा प्रवीण पारीक यांनी पत्नी मीना यांच्या नावे १३ लाख ७५ हजारात बुक केला. धनादेशाद्वारे तसेच बँकेकडून कर्ज घेऊन पारीक यांनी ११ लाख ७२ हजार २८५ रुपये मेहताला दिले. करारनाम्यानुसार नोव्हेंबर २०१४ मध्ये आरोपी तक्रारदार यांना फ्लॅट ताब्यात देणार होता. करार संपून वर्ष उलटले तरी आरोपीने फ्लॅटचे बांधकाम पूर्ण केले नाही.बँकेने तक्रारदाराला दिलेल्या कर्जाची परतफेड सुरू झाली. आरोपी सतत त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत होता. दरम्यान, त्यास भागीदारांचीच फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केल्याचे कळताच त्यांनी शनिवारी क्रांतीचौक ठाण्यात मेहताविरुद्ध फिर्याद नोंदविली.अन्य ग्राहकांनाही गंडविलेपारीक यांच्यासह सचिन रणसुबे, अशोक बदाडे, गजानन नालेगावकर, अनिरुद्ध तडलिंबेकर आणि वनमाला राजपूत या ग्राहकांनाही मेहताने गंडविले आहे. या सहा जणांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शेख अकमल हे करीत आहेत.
मेहताविरुद्ध आणखी एक गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:03 IST