औरंगाबाद : वाळूजजवळ १०८ रुग्णवाहिकेला आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने रुग्णाला सोडून परत जाताना ही घटना घडली. मात्र, रुग्णांचे जीव वाचविणाऱ्या रुग्णवाहिकांच ‘आजारी’ असल्याचे यानिमित्ताने समोर आले. नव्या रुग्णवाहिका मिळतच नसल्याने भंगार रुग्णवाहिकांवर शासकीय आरोग्य यंत्रणेची मदार आहे.
रुग्णसेवा देत असल्याने खासगी रुग्णवाहिकांच्या अवस्थेकडेही कानाडोळा केला जात आहे. रुग्णवाहिका हा रुग्णसेवेचा कणा मानला जातो. गंभीर आजारी, अत्यवस्थ, जखमी रुग्णाला कमीत कमी वेळेत रुग्णालयात पोहोचविण्यासाठी रुग्णवाहिका महत्त्वाची भूमिका निभावतात. परंतु आजघडीला शासकीय यंत्रणा भंगार रुग्णवाहिकांवर आरोग्याचा गाडा ओढत आहे. आरोग्य विभागातील १०२ क्रमांकाच्या तब्बल २३ रुग्णवाहिकांचे आयुष्य संपलेले आहे. परंतु तरीही या रुग्णवाहिकांतून रुग्णांची ने-आण केली जात आहे. शासनाकडे वारंवार नव्या रुग्णवाहिकांची मागणी केली जात आहे. परंतु नव्या रुग्णवाहिका मिळत नसल्याची परिस्थिती आहे. १०८ या रुग्णवाहिकेमुळे हजारो रुग्णांना नवे आयुष्य मिळाले आहे. परंतु आगीच्या घटनेने रुग्णवाहिकांच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याविषयी शंका उपस्थित होते आहे. १०८ रुग्णवाहिकांची नियमितपणे देखभाल-दुरुस्ती, आरटीओ कार्यालयाकडून तपासणी केली जात असल्याचे समन्वयक ओमकुमार कोरडे म्हणाले.
एजन्सीची चौकशी केली जाणार
१०८ रुग्णवाहिका या बिव्हिजी या एजन्सीच्या माध्यमातून चालविण्यात येतात. आग लागलेल्या रुग्णवाहिकेची शेवटची सर्व्हिंग कधी केली होती, आगीचे कारण आदीसंदर्भात या एजन्सीची चौकशी केली जाईल. काही १०२ रुग्णवाहिका खराब आहे. त्यामुळे नव्या रुग्णवाहिकांची मागणी करण्यात आली आहे.
- डाॅ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक
--
रुग्णवाहिकांना सूचना देणार
सदर रुग्णवाहिकेची मेकॅनिकल बिघाडाच्या दृष्टीने आरटीओ कार्यालयामार्फत तपासणी केली जाईल. परंतु आगीचे नेमके कारण अग्निशमन दल, फाॅरेन्सिक लॅबच सांगू शकतील. आगीचे कारण, प्राथमिक अंदाज मिळताच जिल्ह्यातील सर्व रुग्णवाहिकांना सूचना दिल्या जातील.
- संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी
--------
जिल्ह्यातील एकूण रुग्णवाहिका - ५३८
१०२ रुग्णवाहिका - ७०
१०८ रुग्णवाहिका - ३१
घाटीतील रुग्णवाहिका - ९