विद्यापीठ : समारंभपूर्वक गीत भीमायन ध्वनीफितीचे लोकार्पण
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे अनावरण तसेच ‘गीत भीमायन’ ध्वनिचित्रफितीचे विमोचन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
विद्यापीठातील मुख्य इमारतीत प्रवेश करताना दर्शनी भागात बाबासाहेबांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त बुधवारी सकाळी ९ वाजता हा ऑनलाइन अनावरण सोहळा होईल. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले असतील. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजेश करपे, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, चित्रकार प्रा. दिलीप बडे, कार्यकारी अभियंता रवींद्र काळे आदींची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमापूर्वी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्यापीठातील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येईल.
या विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता तथा प्रख्यात चित्रकार प्रा. दिलीप बडे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र रेखाटले आहे. गेल्या ३५ वर्षात अनेक आंतरराष्ट्रीय प्रदर्शनातदेखील त्यांची चित्रे गौरविली गेली आहेत. त्यांनी रेखाटलेली महापुरुषांची अनेक तैलचित्रे महापालिका, विधानभवनमध्ये प्रेरणादर्शक ठरली असून विद्यापीठातही छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे तैलचित्रही प्रा. दिलीप बडे यांनी रेखाटलेली आहे. याबद्दल त्यांना यावेळी गौरविण्यात येणार आहे.
याच कार्यक्रमात मंत्री राऊत यांच्या हस्ते ‘गीत भीमायन’ या वामन दादा कर्डक रचित गीतांच्या ध्वनिचित्र फितीचे प्रकाशन करण्यात येईल. प्रा संजय मोहड यांनी सदर गीतांना संगीत दिले आहे. डॉ. आंबडेकर यांच्या जीवनकार्याचा वेध घेणारी ही गीते प्रख्यात गायिका कविता कृष्णमूर्ती, ए. हरिहरन, सुरेश वाडकर, रवींद्र साठे, साधना सरगम, रघुनंदन पणशीकर, आरती अंकलीकर, मंजुषा पाटील, सावनी शेंडे, बेला शेंडे यांनी गायली आहेत.
चौकट...........
माझ्यासाठी अभिमानाचा क्षण
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव असलेल्या या विद्यापीठात त्यांचे पूर्णाकृती तैलचित्र लावण्यात येत आहे. तसेच ‘गीत भीमायन’ हा महत्त्वाकांक्षी गीतांचा प्रकल्प साकारला जात आहे. या विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतरचा माझ्यासाठी हा अत्यंत आनंदाचा व अभिमानाचा क्षण आहे, अशी भूमिका कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केली.