पाच, दहा आणि शंभर रुपयांच्या जुन्या नोटा बंद होण्याचे वृत्त प्रसारित झाल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक भागातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली. यावेळीही नाेटाबंदीसारखी परिस्थिती होते की, काय अशी भिती नागरिकांना वाटत आहे. कन्नड शहरातील अनेक बँका या फाटक्या नोटा स्वीकारत नसल्यामुळे नागरिकांची गोची होत आहे. विशेष म्हणजे सहकारी बँकांमध्ये ग्राहकांना याचा अनुभव येत आहे. इतर सरकारी व खाजगी बँकांमध्येही केवळ त्यांच्या ग्राहकांच्याच नोटा स्वीकारत असल्याचे बुधवारी लोकमतच्या पाहणीत आढळून आले.
चौकट
नोटा जमा करणारे मोजकेच ग्राहक आढळले
पाच, दहा आणि शंभर रुपयांच्या जुन्या नोटा बंद होण्याचे वृत्त प्रसारित झाल्याच्या पार्श्वभूमीवर कन्नड शहरातील बँकांमध्ये पाहणी केली असता, बँकेतील ग्राहकांमध्ये जीर्ण नोटा जमा करणारे मोजकेच ग्राहक दिसून आले. अर्थात राष्ट्रीयकृत बँकाही आपल्या खातेदारांच्याच फाटक्या नोटा स्वीकारतांना आढळून आल्या. तर सहकारी बँका मात्र फाटक्या व चिकटविलेल्या नोटा परत करतांना दिसून आल्या.
चौकट
फक्त खातेदारांच्याच फाटक्या नोटा स्वीकारल्या जातात.
यापूर्वी बँकेत फाटक्या व जीर्ण नोटा बदलून देण्यात येत होत्या. मात्र आता करंसी चेस्ट (चलन पेटी) नसल्याने फक्त खातेदारांच्याच फाटक्या अथवा जीर्ण नोटा स्वीकारल्या जातात, असे स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक उत्तम बदाले यांनी सांगितले.
कोट
सहकारी बँकेत पैसे भरणा करण्यासाठी गेलो असता, बंडलमधून फाटक्या व जीर्ण नोटा काढून परत दिल्या. मात्र राष्ट्रीयीकृत बँकेत भरणा करतांना अशी अडचण येत नाही.
दीपक पाटोदी, कृषी सेवा केंद्राचे मालक
कोट
चलनात चालण्यायोग्य जुन्या व फाटक्या नोटा आम्ही स्वीकारतो. आमच्याकडून दूधाचा घाऊक व्यापारीही या नोटा घेतो, त्यामुळे बँकेत जुन्या नोटा जमा करण्याची वेळच आली नाही.
नीलेश मोराणकर, दूधविक्रेता
कोट
जास्त तुकडे असलेली नोट आम्ही स्वीकारत नाही. कारण पतसंस्थांचे पिग्मी एजंट आता या नोटा घेत नाहीत. त्यामुळे अडचणी येतात. यामुळे आम्ही ग्राहकांना चलनात चालण्यायोग्य नोटाच देण्याचे सांगतो.
संजय वाघ, किराणा दुकानदार