औरंगाबाद : बालगायक सय्यम नाबेडाच्या जादुई आवाजाने साऱ्या भाविकांना मोहिनी घातली. बाहेर पाऊस पडत होता आणि मंडपात सारे जण भक्तिरसात न्हाऊन निघत होते. निरागस आणि सुमधुर आवाजाने सय्यमने साऱ्यांच्या हृदयात स्थान मिळविले. भक्तिरसाचा परमोच्च आनंद प्राप्त करून देणारा हा भक्तिसंध्येचा कार्यक्रम सिडको एन-३ येथील शंखेश्वर पार्श्वनाथ जैन जिनालय परिसरात अनुभवास मिळाला. गुरू गौतम श्री श्वेतांबर वर्धमान जैन सेवा संघाच्या वतीने पर्युषण महापर्व महोत्सवानिमित्त आयोजित या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात सारे रमले होते. अवघ्या ११ वर्षांचा सय्यम अतिशय समरसून आणि अंत:करणपूर्वक प्रत्येक भक्तिगीत सादर करीत होता. प्रत्येक गीतामधील पंच, भाविकांकडून कधी प्रतिसाद घ्यायचा, त्यांना आपल्या गीतामध्ये कधी सामील करून घ्यायचे आणि भगवंताचा जयजयकार कधी करायचा, हे सारे त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने केले. दीपक करणपुरिया यांनी गायलेल्या ‘ओम णमो अरिहंताय नम: ओम णमो सिद्धानम’ या णमोकार महामंत्राने कार्यक्रमास प्रारंभ झाला. ‘प्रभुवरजी तुमको किसने सजाया है’ हे गीत गातच सय्यम नाबेडाने मंडपात प्रवेश केला. त्याच्या आत्मविश्वासपूर्ण गायनाने सारेच आश्चर्यचकित झाले. त्यानंतर त्याने ‘शृंगार तेरा प्रभुवर तो किसने सजाया है’, ‘ मेरे मोबाईलपे आया टेलिफोन भक्तोसे प्रभुवर बात करे, मुझे शंखेश्वर बुलाया है, अशी एकानंतर एक भक्तिगीते सादर केली जात होती आणि सारे जण भक्तिरसात हरखून गेले होते. दोनदिवसीय भक्ती मेळासाठी आलेल्या सय्यम नाबेडाचा २५ रोजीही रात्री ७.३० वाजता कार्यक्रम होणार आहे.
बालगायक सय्यमच्या भक्तिगीतात सारे रमले
By admin | Updated: August 25, 2014 00:24 IST