औरंगाबाद : येत्या पावसाळ्याच्या अनुषंगाने विभागातील सर्व बंधारे, पूल, मोठे व लघु प्रकल्पांची तपासणी केली जात आहे. मातीचे बंधारे, सिमेंट बंधारे, लघु बंधाऱ्यांची पाहणी करून विकेंद्रित पाणीसाठ्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर आॅडिट करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी मंगळवारी आपत्ती व्यवस्थापन बैठकीत दिले. प्रत्येक जिल्ह्यात प्रगतिपथावर असलेली जलयुक्त शिवार अभियानाची कामे सुरक्षित टप्प्यात आणावीत. ज्यामुळे पावसाळ्यात कुठलेही नुकसान होणार नाही. काही ठिकाणची कामे अर्धवट आहेत. पावसाळ्यात त्या कामांमुळे धोका निर्माण होऊ नये. तसेच पूर रेषेच्या आतील गावांमधील लोकांचे स्थलांतरण लवकरात लवकर करावे. आपत्ती व्यवस्थापनात सर्व विभागांनी चांगली तयारी केली असून जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात बैठकादेखील झाल्या आहेत. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात नेहमीप्रमाणे नियंत्रण कक्ष कार्यान्वित केले जावेत.या कक्षात जबाबदार अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाऊन कक्षाकडे उपलब्ध झालेली माहिती संबंधित यंत्रणांना तात्काळ कळविण्यात यावी. विविध विभागांनी करावयाच्या कामांबाबत आयुक्तांनी सूचना दिल्या. गोदावरी महामंडळाने विभागातील मोठ्या धरणांशी निगडित सर्व माहिती संगणक संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेली आहे, ही माहिती वेळोवेळी अद्ययावत केली जाणार आहे.
सर्व बंधाऱ्यांचे आॅडिट करण्याचे आदेश
By admin | Updated: May 25, 2016 00:02 IST