औरंगाबाद : मेल्ट्राॅन रुग्णालयाच्या विकासासाठी २२ कोटींचा निधी तसेच इतर ९ रुग्णालयांच्या अत्याधुनिकरणासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे निधीची मागणी केल्याची माहिती मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या निर्देशानुसार महानगरपालिका आरोग्य केंद्र आणि रुग्णालयांच्या अत्याधुनिकीकरणासाठी राजेश टोपे यांच्याकडे निधीची मागणी केली. महानगरपालिकेच्या ९ हॉस्पिटलमध्ये डायलेसिस युनिट, सोनोग्राफी सेंटर, नेत्र चिकित्सक सेंटर, २४ तास मॅटर्निटी हॉस्पिटल आदी सेवेसाठी निधीची मागणी केली आहे. तसेच कोविड टेस्टिंग, लसीकरण वाढवण्यासाठी मनुष्यबळ लागणार असून, त्यांच्या वेतनासाठी ‘एसडीआरएफ’ फंडातून निधी देण्याची मागणीही केल्याचे डाॅ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.
२६ केंद्रांना महालॅब सेवा देण्याचे आदेश
महानगरपालिकेच्या ४० आरोग्य केंद्रांपैकी फक्त १४ आरोग्य केंद्रात महालॅबची सेवा देण्यात येते. उर्वरित २६ आरोग्य केंद्रांनाही महालॅबची सेवा देण्यात यावी, या मागणीची राजेश टोपे यांनी दखल घेऊन आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधून २६ आरोग्य केंद्रांनाही महालॅब सेवा देण्याचे आदेश दिले आहेत, असे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.