लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर : शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत जिंतूर तालुक्यामध्ये ३ लाख ३५ हजार ३३८ वृक्षांची लागवड केली जाणार असल्याची माहिती येथील वनक्षेत्रपाल डी. के. डाखोरे यांनी दिली आहे. राज्य शासनाच्या वतीने १ ते ७ जुलैदरम्यान ४ कोटी वृक्षलागवड मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यामध्येही सव्वासात लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिंतूर तालुक्यामध्ये वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग व इतर यंत्रणेमार्फत वृक्षलागवड करण्यात येणार आहे. जिंतूर तालुक्याला ३ लाख ३५ हजार ३३८ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. यामध्ये वन विभागाच्या वतीने २ लाख ५४ हजार ८०० वृक्षलागवड केली जाणार आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने १० हजार तर ईतर यंत्रणेमार्फत ७० हजार ७३६ रोपांची लागवड केली जाणार आहे. यामध्ये शासकीय, निमशासकीय कार्यालय, संस्थेतील अधिकारी, कर्मचारी सहभागी होणार आहेत. सकाळी ६ ते दुपारी १ पर्यंत वृक्षलागवड केली जाणार आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुपारी एक वाजेपर्यंत कार्यालयात येण्यास मुभा देण्यात आली आहे; परंतु, वृक्ष लागवड करतानाचे छायाचित्र त्यांना सादर करावे लागणार आहे.
सव्वातीन लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
By admin | Updated: June 26, 2017 23:49 IST