अहमदपूर : आजच्या जमान्यात जे हाती पडेल ते आपलेच, असे म्हटले जाते़ परंतु, तालुक्यातील उमरगा यल्लादेवी येथील एका आॅटोचालकाने ही आधुनिक म्हण खोटी ठरविली आहे़ आॅटोचालकाने आपल्या वाहनात विसरलेले सोन्याच्या दागिण्यांसह २ लाख ८५ हजार रुपये परत देऊन प्रामाणिकपणा दाखवून दिला आहे़ या आॅटोचालकाच्या प्रामाणिकतेची या भागात चर्चा सुरु असून कौतूक होत आहे़लोहा तालुक्यातील लिंबोटी येथील हावगी मलशेट्टे हे कणकवली येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत़ मलशेट्टे हे बुधवारी दीपावली सणानिमित्त पत्नी व मुलासमवेत सासरवाडी असलेल्या अहमदपूरला येत होते़ ते कणकवली येथून लातूर रोडपर्यंत रेल्वेने आले़ अहमदपूरला जाण्यासाठी त्यांनी एमएच २४, सी ५४३४ हा आॅटो ठरविला आणि सोबतचे साहित्य आॅटोमध्ये ठेऊन ते सर्वजण बसले़अहमदपूर येथे येताच मलशेट्टे हे आपले साहित्य घेऊन उतरले़ त्यामुळे आॅटोचालक बलिराम सोमवंशी हे आॅटो घेऊन आपल्या गावाकडे निघाले़ सोमवंशी हे गावानजीक पोहोचले असताना आॅटोमध्ये मोबाईल वाजण्यास सुरुवात झाली़ त्यामुळे त्यांनी आॅटोमध्ये पाहिले असता मलशेट्टे यांची एक लहान बॅग विसरल्याचे लक्षात आले़ त्यांनी मोबाईल उचलून मलशेट्टे यांना तुमची बॅग सुरक्षित असल्याचे सांगितले व ही बॅग घेऊन जाण्यासाठी माझ्या गावास या असे सांगितले़बॅग सुरक्षित असल्याचे ऐकून मलशेट्टे यांना आनंद झाला़ ते आणि त्यांचे मेहुणे चंद्रशेखर हामणे हे उमरगा यल्लादेवी गावास जाऊन सोमवंशी यांची भेट घेतली़ तेव्हा सोमवंशी यांनी त्यांची बॅग परत दिली़ या बॅगेत १० तोळ्यांच्या सोन्याचे दागिणे, रोख १५ हजार रुपये, आणि एक मोबाईल होता़ त्याची किंमत २ लाख ८५ हजार रुपये आहे़ बॅग सुरक्षितपणे परत मिळाल्याने मलशेट्टे यांनी आनंद व्यक्त करुन सोमवंशी यांचे कौतुक केले़ घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असलेल्या सोमवंशी यांच्या प्रामाणिकतेबद्दल कौतुक होत आहे़ (वार्ताहर)
अहमदपुरात आॅटोचालकाने परत केले दहा तोळ्यांचे दागिणे
By admin | Updated: October 28, 2014 00:58 IST