गंगाधर तोगरे, कंधारलातूर लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवाराला डोळे दीपवणारी आघाडी लोहा-कंधारने दिली. विद्यमान आमदारांनी सिंचन, बंधारे, तलाव, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न मार्गी लावले, असे सतत सांगत असताना कमळाने पाणी कसे शोषून घेतले? याचा आढावा रंजक आहे़ त्यामुळे आमदारांचा राजकीय कस लागणार असे चित्र आहे़ लोहा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, राकाँ आघाडी व भाजपा-सेना युतीत सरळ लढत अशक्य आहे. कारण मनसे, बंडखोरी आदींमुळे लढत बहुरंगी होण्याचे संकेत आहेत. त्यात तुल्यबळ तिरंगी की चौरंगी हे कळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राकाँ पुढाऱ्यांची पुरती गोची झाली. आघाडीतील पुढारी-कार्यकर्त्यांचा ताळमेळ नव्हता. काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना मात्र भाजपाला मिळालेली आघाडी जिव्हारी लागली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत याची जबर किंमत वसूल करण्याचे राष्ट्रवादीला आव्हान दिले असल्याची चर्चा रंगत आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या आदेशाने आम्ही आघाडीचा धर्म पाळायचा आणि राष्ट्रवादीने केवळ देखावा निर्माण करायचा अशा संतप्त भावना उमटत असून हक्काचा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे घेण्याचा सूर उमटत आहे. यातून आघाडीतील विसंवादालाही तोंड फुटले आहे.२००९ साली विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यापासून आ. शंकरअण्णा धोंडगे यांनी सिंचन, दळवणळण, पिण्याचे पाणी, बंधारे, तलाव आदी विषयांवर भर दिला. ही कामे खेचून आणून पूर्ण केली. आगामी दोन-तीन वर्षांत संपूर्ण हिरव्या शेतीचा संकल्प जाहीर केला. कामाचा एवढा धडका असताना त्याचे मतदानात रुपांतर होऊ शकले नाही, हा अण्णालाही न उलगडणारा प्रश्न आहे. त्यातच रामचंद्र येईलवाड, जनाबाई नाकाडे यांनी आमदारांविरोधात सूर आळवला आहे. माधवराव तेलंग, गारोळे सारखेही विरोधात बोलून दूर गेले आहेत. माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि त्यामुळे अण्णा-चिखलीकर वाद पक्षातच विकोपाला गेला. लोहा न. प. निवडणुकीत आमदारांनी राकाँ पक्ष प्रचारातून काढता पाय घेतला, अलिप्त राहणार असल्याचे जाहीर केले. विद्यमान आमदार राष्ट्रवादीचा असूनही निवडणुकीपासून दूर राहिल्याने चर्चेचा विषय झाला. विधानसभेची पक्षीय उमेदवारी मलाच मिळणार, असे चिखलीकर यांच्याकडून सांगितले जात आहे. विद्यमान आमदार व माजी आमदार यापैकी उमेदवार कोण? याची उत्सुकता राहणार आहे. लोहा न. प. निवडणुकीत मनसे-शेकाप-काँग्रेस आणि आमदार अशी छुपी आघाडी होती. काँग्रेसने न. प. आपल्या ताब्यात घेण्यापेक्षा चिखलीकर, प्रा. मनोहर धोंडे यांना राजकीय शह दिला. त्यात माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी अॅड. मुक्तेश्वर धोंडगे व जावई जि. प. सदस्य प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांची सर्व राजकीय ताकद मिळवित मनसेला यश मिळवून दिले. राज्यभर लोहा निवडणुकीची चर्चा झाली. मनसे प्रमुखांकडून कौतुकही झाले. त्यामुळे आगामी विधानसभेचे वेध रोहिदास चव्हाण यांना लागले आहेत. परंतु नात्यागोत्याच्या राजकारणावर सर्व अवलंबून आहे. काँग्रेसने मात्र लोहा निवडणुकीतील भूमिकेतून कोणता राजकीय लाभ घेतला? हे कळायला मार्ग नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपाला आघाडी मिळवून देण्यात अॅड. मुक्तेश्वर धोंडगे व प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांचे मोठे योगदान आहे. मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीची पाहणी करण्यास दिवंगत गोपीनाथराव मुंडे कंधार भागात फिरले. बहाद्दरपुरा येथे मुंडे यांनी भाई केशवराव धोंडगे यांची भेट घेतली. यात राजकीय चर्चा झाली. अॅड. धोंडगे यांना विधानसभेसाठी मदत करण्याचे निश्चित झाले. एवढेच नाही तर मुंडे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, प्रवक्ते माधव भंडारी यांनाही याविषयी कळविले. त्यामुळे धोंडगे बंधुंनी शिस्तबद्ध प्रचार यंत्रणा राबविली़ त्यामुळे भाजप उमेदवाराला ९५ हजार २४९ मते मिळाली तर काँग्रेसला अवघी ३६ हजार ९३३ मते मिळाली. अॅड. धोंडगे व सर्व सहकाऱ्यांचे कौतुक झाले आणि आमदारकीची दावेदारी बळकट झाली.राष्ट्रवादीमध्ये शंकरअण्णा धोंडगे व प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात उमेदवारी मिळविण्यासाठी चुरस आहे. मनसेत मात्र रोहिदास चव्हाण, शिवा नरंगले या दोघांपैकी एक उमेदवार असण्याची शक्यता आहे. युतीकडून प्रा. मनोहर धोंडे यांची उमेदवारी पक्की समजली जात आहे, परंतु गोपीनाथराव यांनी जागा आदला-बदलीचे सुतोवाच अॅड. धोंडगे यांच्यापुढे केले होते. आता मुंडे हयात नाहीत. तरीही भाजपा नेते यामधून कसा मार्ग काढतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. विद्यमान आमदार, दोन माजी आमदार, अॅड. धोंडगे, प्रा. धोंडे, नरंगले मात्र तयारीत आहेत. लोहा मतदारसंघपुरुष मतदार १३०८६२स्त्री मतदार ११८२५८एकूण मतदार २४९१२०लोकसभा - २०१४ झालेले मतदान१४७६४६दत्तात्रय बनसोडे (काँग्रेस) ३६९३३डॉ़सुनील गायकवाड ९५२४९(भाजपा) भाजपास आघाडी ५८३१६
शेती-सिंचनाचे पाणी ‘कमळा’ ने शोषिले
By admin | Updated: June 9, 2014 00:31 IST