औरंगाबाद : सेवा नियमित करण्यासह विविध मागण्यांसाठी घाटी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी नव्या वर्षाच्या प्रारंभीच आंदोलनात उतरत आहे. १ ते ७ जानेवारी दरम्यान काळ्या फिती लावून रुग्णसेवा दिली जाणार आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास ११ जानेवारीला कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी सेवा नियमित करण्याच आश्वासन दिले होते. डिसेंबर २०२० पूर्वी सेवा नियमित होईल, असे सांगण्यात आले; परंतु या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. कोराेना प्रादुर्भावात वैद्यकीय अधिकारी फ्रंटलाईनवर रुग्णसेवेसह दैनंदिन जबाबदारी पार पाडत आहे. परंतु, सेवा नियमित करण्यावर कोणतेही पाऊल उचलले जात नाही. इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोगही लागू करण्यात आलेला नाही. त्यामुळे मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच आंदोलन केले जात आहे. यासंदर्भात वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय अधिकारी संघटनेतर्फे न अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. भारत सोनवणे, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रीती बिराजदार, डॉ. विकास राठोड, डॉ. संजय वाकुडकर, आदी उपस्थित होते.
फोटो ओळ..
अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांना निवेदन देताना वैद्यकीय अधिकारी.