उस्मानाबाद : बंद असलेल्या डीपीच्या दुरूस्तीकडे महावितरणचे दूर्लक्ष होत असल्याने मेडसिंगा येथील ९ शेतकऱ्यांनी विषपिवून आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता़ शेतकऱ्यांनी आत्महत्येचा इशारा देताच जागे झालेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ नवीन डीपी दिला़ विशेष म्हणजे तत्काळ डीपी शेतात बसवून विद्युत पुरवठाही सुरळीत करण्यात आला़उस्मानाबाद तालुक्यातील मेडसिंगा येथील आगळे डीपी नंबर दोन हा जवळपास वीस दिवसांपूर्वी जळाला होता़ डीपी जळाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पाण्याअभावी जळून जात होती़ एकीकडे निसर्गाचे दुष्टचक्र सुरू असताना दुसरीकडे महावितरणच्या कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले होते़ बंद असलेला डीपी दुरूस्त करून द्यावा किंवा दुसरा डीपी द्यावा, या मागणीसाठी सहाय्यक अभियंता विठ्ठल देशमुख, अभियंता बावणे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू केला होता़ मात्र, वीस दिवसांचा कालावधी लोटला तरी डीपी देण्यास विविध कारणे देत टाळाटाळ करण्यात येत होती़ या प्रकारामुळे संतापलेल्या मेडसिंगा येथील जीवन आगळे, सौदागर शेलार, आबा आगळे, मनोज जाधव, बाळासाहेब रणदिवे, दत्तात्रय शेलार, आप्पारााव शेलार, विकास जाधव आदी शेतकऱ्यांनी मंगळवारी महावितरणच्या आठवडी बाजारातील कार्यालयात विष पिवून आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता़ शेतकऱ्यांनी अचानक आक्रमक पवित्रा घेतल्याने जागे झालेल्या महावितण कंपनीने तत्काळ दुसरा डीपी शेतकऱ्यांना दिला़ यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता़ दरम्यान, डीपी दिल्यानंतर कनिष्ठ अभियंता वडगावकर, लाईनमन चोपाटे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आगळे डीपी क्रमांक दोन बसवून वीजपुरवठा तत्काळ सुरळीत केला़ वीजपुरवठा पूर्ववत झाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे़ (प्रतिनिधी)
वीस दिवसानंतर वीजपुरवठा
By admin | Updated: January 21, 2015 01:08 IST