लातूर : स्टार क्राप्ट मनोरंजन कंपनी मुंबईच्या वतीने ‘सैराट’ व ‘चला हवा येऊ द्या’ मधील कलाकारांचा क्रीडा संकुलावरील कार्यक्रम क्रीडाप्रेमींच्या दबावामुळे अखेर रद्द करण्यात आला. क्रीडा संकुलात मोठ मोठे खड्डे खोदून बॅरिगेटस् टाकले जात होते. यामुळे संकुलाचे मोठे नुकसान झाले. परिणामी, संतप्त झालेल्या क्रीडाप्रेमींनी शुक्रवारी सकाळी कार्यक्रमाच्या पेण्डॉलचे साहित्य जाळले. क्रीडाप्रेमींच्या या दबावामुळे संयोजकांनी १६ आॅक्टोबर रोजीचा ‘सैराट’ कार्यक्रम रद्द केला आहे.उजनी येथील श्री समर्थ बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या मदतीसाठी आर्चीच्या उपस्थितीत ‘सैराट’ कार्यक्रम होणार होता. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी संकुलातील मैदानावर पेण्डॉल उभारण्यासाठी खड्डे खोदण्यात आले होते. यातून मैदानाचे मोठे नुकसान झाले. या मैदानावर दररोज सकाळी शेकडो खेळाडू सरावासाठी येतात. मात्र कार्यक्रमाची तयारी होत असल्याने त्यांना सरावासाठी जागाही मिळेना. ज्येष्ठ नागरिकांनाही फिरण्याची अडचण झाली. त्यातच मैदानाचे नुकसान होत होते. ही बाब सहन न झाल्याने ज्येष्ठ नागरिकांसह सकाळी मैदानात आलेल्या खेळाडू व क्रीडाप्रेमींनी पेण्डॉल उभारणीचे काम बंद पाडले. शिवाय, पेण्डॉलच जाळला. परिस्थिती चिघळण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड घटनास्थळी दाखल झाले. यावेळी उपस्थित गणेश गवारे, संतोष देशमुख यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना मैदानाचे झालेले नुकसान दाखविले. त्यामुळे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले. जरी परवानगी असली, तरी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संयोजकांवर गुन्हे दाखल होतील, अशी भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतल्याने अखेर संयोजकांनी कार्यक्रम रद्द केल्याचे जाहीर केले आहे. गैरसोयीबद्दल स्टार क्राप्ट मनोरंजन कंपनीने दिलगिरी व्यक्त केली असून, ज्यांनी प्रवेशिका घेतल्या आहेत, त्यांनी ७४७४८११३३३, ७४७४८११६६६ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)
क्रीडाप्रेमींच्या दबावामुळे अखेर ‘सैराट’करांची ‘हवा’ गुल
By admin | Updated: October 15, 2016 00:51 IST