लातूर : मुंबई-लातूर रेल्वे बीदरपर्यंत नेण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला आहे़ यापूर्वी मुंबई-लातूर ही रेल्वे नांदेडपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला होता़ त्याला लातूरकरांनी तीव्र विरोध करून निर्णय हाणून पाडला़ मात्र आता पुन्हा रेल्वे प्रशासनाने बीदरपर्यंत ही रेल्वे विस्तारित करण्याचा घाट घातला आहे़ लातूर-मुंबई रेल्वेला लातूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात प्रवासी आहेत़ दररोज २०० ते ३०० प्रवाशांची वेटिंग असते़ उत्पन्नही मोठ्या प्रमाणात आहे़ प्रवाशांची लक्षणीय संख्या लक्षात घेता पाच बोगी वाढविण्याची मागणी लातूरकरांची असताना ही रेल्वे बीदरपर्यंत नेण्याचा घाट घातला आहे़ तो लातूरकरांवर अन्यायकारक आहे़ बीदरसाठी हैदराबाद-पुणे, बीदर -मुंबई या गाड्या आठवड्यातून अनुक्रमे दोन, तीन वेळा धावतात़ पुन्हा आता मुंबई-लातूर रेल्वे बीदरपर्यंत नेण्याचा घाट कशासाठी, असा प्रश्न लातूरच्या जनतेने उपस्थित केला आहे़ शिवाय, बीदरहून लातूर-मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचीही संख्या नगण्य असताना लातूर-मुंबई रेल्वेचा विस्तार बीदरपर्यंत कशासाठी असा सवाल मराठवाडा जनता विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी नरहरे यांनी उपस्थित केला आहे़ मुंबई-लातूर रेल्वेचा विस्तार बीदरपर्यंत करायचा असेल तर यशवंतपूर-बीदरपर्यंत करणे आवश्यक आहे़ मात्र असा विचार रेल्वे प्रशासनाचा दिसत नाही़ पुणेपर्यंत रेल्वे सुरू करण्याची मागणी रेल्वेमंत्रालयाकडे प्रलंबित आहे़ रेल्वे ट्रॅकच्याही मागण्या प्रलंबित आहेत़ या मागण्यांचा विचार न करता थेट लातूर- मुंबई रेल्वेचा विस्तार बीदरपर्यंत करणे लातूरच्या प्रवाशांवर अन्याय आहे़ या अन्यायाच्या विरोधात लातूरकर जनांदोलन करून दूर करतील, असा इशारा शिवाजी नरहरे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे़
नांदेडनंतर आता मुंबई-लातूर रेल्वे बीदरपर्यंत पळविण्याचा घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2017 23:26 IST