औरंगाबाद : आतापर्यंत अनेकदा कारवाईचा बडगा उगारूनही हेल्मेट न वापरणाऱ्यांना होळीनंतर मोठा आर्थिक दंड सहन करावा लागणार आहे. कायदा न पाळणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही, असे सांगून होळीनंतर विनाहेल्मेट फिरणाऱ्या दुचाकीस्वारांना तब्बल ६०० रुपयांची पावती देण्यात येणार आहे. ‘धोकादायक ड्रायव्हिंग’ या कलमान्वये ही कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.कशाला वापरायचे हेल्मेट, शंभरची पावती घेतली तर दिवसभर विनाहेल्मेट फिरता येते, असे म्हणणाऱ्यांचा खिसा यामुळे रिकामा होणार आहे, हे विशेष. जानेवारी महिन्यात जनजागृती केल्यानंतर पोलीस आयुक्तांनी १ फेब्रुवारीपासून औरंगाबाद शहरात हेल्मेट सक्ती सुरू केली. पहिल्याच दिवशी तब्बल दोन लाखांहून अधिक दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरून चांगला प्रतिसाद दिला होता. अनेकांनी हेल्मेट नसल्यामुळे दुचाकी घरीच ठेवून रिक्षातून प्रवास केला; परंतु पोलिसांच्या कारवाईला विरोध केला नाही. तसेच सोशल मीडियातूनही औरंगाबादकरांनी हेल्मेट कसे फायद्याचे आहे याबाबत जनजागृती केली. त्यामुळे पहिल्या दिवसापासून हेल्मेटला चांगला प्रतिसाद मिळत गेला. आजघडीला तब्बल ९० टक्के लोक हेल्मेट वापरत असून उर्वरित दहा टक्के लोकांना इतके सांगितल्यानंतरही कायदा कळत नाही, असे आयुक्तांचे मत बनले आहे. त्यामुळे त्या १० टक्के लोकांना कायद्याचा धडा शिकविण्यासाठी पोलीस आयुक्तांनी दंडाची रक्कम वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थातच ‘धोकादायक ड्रायव्हिंग’ या कलमान्वये पोलीस ही कारवाई करणार आहेत.
होळीनंतर विनाहेल्मेटला ६०० रुपयांची पावती
By admin | Updated: March 17, 2016 00:21 IST