लातूर : शहरातील अनधिकृत बॅनर, होर्डिंग का काढण्यात येत नाहीत. मनपाचे हे कृत्य न्यायालयाच्या आदेशाचा अवमान आहे, असे सांगत अनधिकृत होर्डिंग ७२ तासांच्या आत काढून त्याचा अहवाल सादर करा, असे आदेश न्यायालयाने दिल्याने मनपाचा अतिक्रमण विभाग खडबडून जागा झाला असून, गेल्या दोन दिवसांत शहरातील ४५ होर्डिंग्ज व बॅनर काढण्यात आले. उच्च न्यायालयाने लातूर मनपाला ७२ तासांच्या आत अनधिकृत होर्डिंग व बॅनर काढण्याचे आदेश दिले. त्यामुळे लातूर मनपाच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारपासून अनधिकृत होर्डिंग्ज व बॅनर काढण्यास प्रारंभ केला. गुरुवारी व शुक्रवारी शहरातील रेणापूर नाका, शिवाजी चौक, पाच नंबर चौक, राजीव गांधी चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, बसवेश्वर चौक, गांधी चौक परिसरातील अनधिकृत होर्डिंग्ज काढण्यात आले. गुरुवारी शहरातील २५ होर्डिंग्ज हटविण्यात आले, तर शुक्रवारी २० होर्डिंग्ज काढण्यात आले असल्याचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख एस.के. बोराडे यांनी सांगितले. लातूर मनपाला होर्डिंग काढण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले होते. गुरुवारी सकाळी नोटीस आल्यानंतर अनधिकृत होर्डिंग्ज काढण्यास प्रारंभ केला असून, ४५ होर्डिंग्ज हटविले आहेत. (प्रतिनिधी)
न्यायालयाच्या आदेशानंतर मनपाला जाग
By admin | Updated: March 4, 2017 00:26 IST