औरंगाबाद : नव्याने अस्तित्वात आलेल्या सातारा- देवळाई नगर परिषदेसाठी शासनाला सहा महिन्यांच्या आत निवडणुका घ्यावा लागणार आहेत. त्यामुळे विधानसभेनंतर काही दिवसांतच या ठिकाणी निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सातारा- देवळाईची लोकसंख्या लक्षात घेता या नगर परिषदेत सुमारे २६ नगरसेवक राहतील.नवीन नगर परिषदेच्या हद्दीत एकूण ५० हजार ५७० इतकी लोकसंख्या आहे, तर मालमत्तांची संख्या २५ हजार ९६३ इतकी आहे. त्यामुळे ही नगर परिषद ब वर्गातील राहणार आहे. नगर परिषद प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीस हजार लोकसंख्येपर्यंतच्या नगर परिषदेत २३ नगरसेवक असतात, तर त्यापुढील प्रत्येक ४ हजार लोकसंख्येमागे एक नगरसेवक वाढतो. सातारा- देवळाई संयुक्त नगर परिषदेची लोकसंख्या सुमारे ५१ हजार आहे. त्यामुळे या नगर परिषदेत अंदाजे २६ नगरसेवक राहणार आहेत. नगर परिषदेसाठी प्रभाग रचनाही राहील. एका प्रभागात तीन नगरसेवक राहतील, असे त्यांनी सांगितले. सद्य:स्थितीत सातारा ग्रामपंचायतीमध्ये १७ आणि देवळाई ग्रामपंचायतमध्ये ११ सदस्य आहेत. नगर परिषद स्थापनेमुळे या दोन्ही ग्रामपंचायती बरखास्त झाल्या आहेत. दोन्ही ग्रामपंचायतींमधील २८ सदस्यांऐवजी आता नवीन नगर परिषदेत २६ नगरसेवक राहतील. निवडणुकीसंदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोणतीही नवीन नगर परिषद अस्तित्वात आल्यानंतर तिची अधिसूचना निघाल्यापासून सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेणे आवश्यक असते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर केव्हाही नवीन नगर परिषदेची निवडणूक लागू शकते.
विधानसभेनंतर वाजणार निवडणुकीचा बिगुल
By admin | Updated: August 29, 2014 01:33 IST