पारध : मराठवाडा व विदर्भाला जोडणाऱ्या पारध ते धामणगाव या दोन कि़मी. रस्त्याचा प्रश्न गेल्या कित्येक दिवसांपासून रखडलेला होता. या रस्त्याअभावी विदर्भातून पारध येथे शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत होते.या रस्त्या संदर्भात लोकमतने सातत्याने पाठपुरावा केला. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकतेच या रस्त्याचे काम हाती घेतले असून, पूर्वीचा खराब झालेल्या रस्त्यावरील डांबर जेसीबीच्या साह्याने उखडून काढण्यात येत असून, या रस्त्यावर डांबर व मुरूमाची भरती टाकून नव्याने डांबरीकरण होणार असल्याचे संबंधित विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.या रस्त्याअभावी बुलडाणा, चिखली, मलकापूर आगाराच्या अनेक बसगाड्या बंद करण्यात आल्याने परिसरातून बुलडाणा, मलकापूर येथील बाजारपेठेत माल घेवून जाणाऱ्या शेतकऱ्याची मोठी अडचण झाली होती. तर बसफेऱ्या बंद झाल्याने अवैध वाहतूकही बोकाळली होती.या संदर्भात लोकमतने सतत पाठपुरावा करून संंबंधित विभागाचे लक्ष वेधले व याची दखल घेत विभागाकडून या रस्त्याच्या कामाची युद्ध पातळीवर सुरूवात झाली असल्याने परिसरातील जनतेत समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
अखेर मराठवाडा-विदर्भ रस्त्याचे काम सुरू
By admin | Updated: September 29, 2014 00:38 IST