लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते शाही मशीद या दरम्यानच्या रस्त्याचे काम सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश संबंधित कंत्राटदाराला देण्यात आले आहेत़ १३ सप्टेंबर रोजी सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होत असून, त्यानंतर दर दिवसाला जवळपास २० हजार रुपयांचा दंड संबंधित कंत्राटदाराला ठोठावला जाणार असल्याची माहिती आयुक्त राहुल रेखावार यांनी दिली़शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते शाही मशीद दरम्यानच्या रस्ता रस्ता कामाचे मनपा निवडणुकीपूर्वी उद्घाटन झाले होते़ १ कोटी ९९ लाख ९८ हजार रुपये खर्च करून तयार करण्यात येणाºया या रस्त्याचे काम सहा महिन्यांत पूर्ण करण्याची अट संबंधित कंत्राटदाराला देण्यात आली होती़ या पार्श्वभूमीवर १९ जुलैपासून संबंधित कंत्राटदाराने जलतरणिका कॉम्प्लेक्स समोर रस्ता कामाला सुरुवात करून खोदकाम केले होते़ परंतु, संबंधित कंत्राटदाराकडून अत्यंत मंदगतीने काम सुरू असून, सद्यस्थितीत हे काम बंद आहे़ या अनुषंगाने बुधवारी पत्रकारांनी मनपा आयुक्त राहुल रेखावार यांची भेट घेतली असता रेखावार म्हणाले की, सहा महिन्यांत संबंधित कंत्राटदाराला हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले होते़ १३ सप्टेंबर रोजी सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आहे़ काम मंदगतीने होत असल्याने तीन वेळा कंत्राटदाराला बोलावून समज दिली होती़ तसेच सहा महिन्यांत काम पूर्ण न झाल्यास दरदिवशी साधारणत: २० हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल, असेही सांगण्यात आले आहे़ १३ सप्टेंबरनंतर ही कारवाई अंमलात आणली जाणार असल्याचे रेखावार म्हणाले़
१३ सप्टेंबरनंतर कंत्राटदारास दररोज २० हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:24 IST