पडेगाव येथील कचराप्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी पडेगाव कचरा प्रकल्पाची पाहणी केली. याठिकाणी कचर्याचा डोंगर पाहून पांडेय अवाक झाले. त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तसेच हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर प्रतिदिन २०० मेट्रिक टनापेक्षा जास्त कचर्यावर प्रक्रिया केल्यास कंत्राटदारास बक्षीस दिले जाईल, असे जाहीर केले.
पडेगाव येथील नियोजित कचराप्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पालिका आयुक्त पांडेय यांनी मंगळवारी कचराप्रकिया केंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी तेथील कचरा मोजणी काट्याची स्वतः रिडिंग घेऊन तपासणी केली. या ठिकाणी संपूर्ण कचराप्रक्रिया केंद्रात प्रत्येक मशीनवर होणार्या कामाच्या तपासणीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. तसेच त्यांची जोडणी मोबाइलमध्ये दिसण्याजोगी करावी, अशीही सूचनाही केली. या प्रकल्पामध्ये जमा केलेल्या कचर्याच्या ढिगाच्या उंचीमुळे लोखंडी कॉलम गंजण्यास सुरुवात झाली आहे. त्यावर आयुक्तांनी कंत्राटदार भाटी यांना सूचना केली की, कचर्यावर जास्तीत जास्त प्रक्रिया करून हे ढिगारे कसे संपविण्यात येतील, याचे नियोजन करावे. सहायक आयुक्त भोंबे यांनी रस्त्यासाठी लागणारी जागा कचरा हटवून कंत्राटदारास उपलब्ध करून द्यावी, जेणे करून प्रकल्प पूर्ण होईल. लिचेड टँकचे काम पूर्ण झाले असल्याने आता भिंतींना रंग देण्याची सूचना आयुक्तांनी केली. यावेळी शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे, उद्यान अधीक्षक विजय पाटील यांची उपस्थिती होती.
श्वानगृहाचे काम तत्काळ सुरू करा
पडेगाव येथील या कचराप्रक्रिया पकल्पाच्या काही अंतरावरच श्वानांसाठी श्वानगृह पालिकेने नियोजित केले आहे. या जागेतही श्वानगृहाचे काम तत्काळ काम सुरू करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.