३ पैकी १ किलोमीटर खोदकाम : पाईपलाईनसाठी शासनाकडून पाईपचा पुरवठा नाही; १२ पंप बसणार...लातूर : मिरजेहून लातूरला रेल्वेद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला असला तरी अद्याप ५० वॅगनमधील पाणी उतरविण्याची क्षमता स्थानिक पातळीवर निर्माण झाली नाही. त्यामुळे सध्या तरी जलपरी १० वॅगनच पाणी घेऊन येत आहे. आतापर्यंत या जलपरीची चौथी खेप शुक्रवारी पूर्ण झाली. रेल्वेस्थानक ते आर्वी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाईपलाईनचे काम सुरू असून, या कामाला किमान आठ दिवसांचा अवधी लागणार आहे. सद्य:स्थितीत तीनपैकी एक किलोमीटरचे खोदकाम झाले असून, राज्य शासनाकडून पाईपलाईनसाठी पाईपचा पुरवठा झालेला नाही.रेल्वेस्थानकातील ट्रॅकच्या बाजूने एस.आर. देशमुख यांच्या शेतातील विहिरीपर्यंत ५०० एमएमआरसी पाईप टाकण्यात आली असून, देशमुखांची विहीर ते टँकर पॉर्इंटपर्यंत ३.५ एचडी पाईप टाकल्या आहेत. यातून सध्या रेल्वेने आलेले पाणी उचलले जात आहे. मात्र विहिरीवर बारा पंप बसविणे तसेच विहीर ते आर्वी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतच्या तीन किलोमीटर पाईपलाईनचे केवळ खोदकाम सुरू आहे. ४० इंची पाईपलाईन जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत टाकली जाणार आहे. हे अंतर तीन किलोमीटरचे आहे. त्यापैकी एक किलोमीटरपर्यंत खोदकाम झाले आहे. प्रगती कन्स्ट्रक्शनमार्फत खोदकाम युद्धपातळीवर सुरू असले तरी पाईपचा पुरवठा शासनाकडून झाला नसल्यामुळे लाईन जोडणी थांबलेली आहे. गुत्तेदारामार्फत मात्र विद्युतपंप आले असून, उद्यापर्यंत विहिरीवर १२ पैकी १० पंप बसणार आहेत. शासनाकडून पाईप पुरवठा होण्याची प्रतीक्षा प्रगती कन्स्ट्रक्शनला आहे. एका पंपाची ४० हजार लिटर प्रती तास पाणी उपसण्याची क्षमता आहे. असे एकूण दहा पंप बसणार आहेत. या दहा पंपाद्वारे ४ लाख ५० हजार लिटर पाणी एका तासात विहिरीतून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत उपसले जाईल. ५० वॅगनमधील २७ लाख लिटर पाणी १० पंपाद्वारे सहा तासांत खाली करण्याची क्षमता या यंत्रणेत आहे. परंतु, खोदकाम आणि पाईपलाईनचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. पंप बसविण्यापासून पाईपलाईन करण्याच्या प्रक्रियेला किमान आठ दिवसांचा अवधी लागेल, अशी शक्यता कन्स्ट्रक्शनमार्फत व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)साडेतीन कोटींची पाईपलाईन...रेल्वे ट्रॅकच्या बाजूने विहिरीपर्यंत ५०० एमएमआरसीसी पाईप आणि ३.५ एचडीपी पाईप बसविण्याचे काम ४८ तासांत पूर्ण झाले. हे रेकॉर्डब्रेक काम असून, विहीर ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतच्या पाईपलाईनच्या कामाला मात्र पाईपचा पुरवठा झाला नसल्यामुळे थोडा व्यत्यय आला आहे. या सर्व कामासाठी ३ कोटी ६३ लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. ५० वॅगनमधील २५ लाख लिटर पाणी उतरवून घेण्याची क्षमता ही यंत्रणा कार्यान्वित झाल्याशिवाय निर्माण होणार नसल्याचे सध्या दिसत आहे. आज पंप बसणार... ट्रॅकलगत आणि विहिरीपर्यंतची पाईपलाईन पूर्ण झालेली आहे. विहिरीवर एकूण १२ पंप बसविण्यात येणार आहेत. त्यापैकी दहा पंपाद्वारे पाणी उपसण्यात येईल. शासनाकडून पाईपचा पुरवठा होणे बाकी आहे. पाईप आल्याबरोबर दोन दिवसांत पाईपलाईनचे काम पूर्ण होईल. ट्रॅकलगतचे काम आम्ही ४८ तासांत पूर्ण केले. त्याच धर्तीवर उर्वरित कामही करण्यात येत असल्याचे प्रगती कन्स्ट्रक्शनचे संचालक गोविंदराव माकणे यांनी सांगितले.
५० वॅगनमधील पाणी उतरवून घेण्यासाठी प्रशासनाची तयारी अपूर्णच
By admin | Updated: April 16, 2016 00:11 IST