बी.व्ही. चव्हाण, उमरीगेल्या चार वर्षांपासून उमरी तालुक्यात आदर्श शिक्षकांचे तालुकास्तरीय पुरस्कार रखडले आहेत़ प्रशासनासह पदाधिकाऱ्यांनाही याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे़जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या शाळांतून अध्यापनाचे कार्य करणारे अनेक शिक्षक दैनंदिन कामाव्यतिरिक्त विविध उपक्रमात सक्रीय असतात़ गावच्या विकासकामातही त्यांचा पुढाकार असतो़ अशा शिक्षकांना पुरस्काराच्या रुपाने प्रोत्साहित करणे आवश्यक आहे़ यासाठी पंचायत समितीला तशी खर्चाची तरतूदही असते़ उमरी तालुक्यात जि़ प़ च्या एकूण ८९ शाळांमधून ३९२ शिक्षक अध्यापनाचे कार्य करतात़ तालुक्यात जि़ प़ च्या शाळांमध्ये १० हजाराच्या आसपास विद्यार्थीसंख्या आहे़ वाडीतांड्यावरील दुर्गम भागातही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे प्रमाण चांगले आहे़ होतकरू शिक्षकांची मेहनत व जिद्द यामुळेच हे शक्य होते़ शिक्षकांचे हे योगदान लक्षात घेण्यासाठी सध्या कुणालाच वेळ नाही़ हे पाहून तालुक्यातील बितनाळ केंद्रातील गुणवंत शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात आले़ खुद्द शिक्षकांनीच हा सत्कार स्वखर्चाने घडवून आणला़ केंद्रीय मुख्याध्यापक शंकरराव मुक्कावार, गटशिक्षणाधिकारी गाढे, शिक्षण विस्तार अधिकारी सय्यद मिस्कीन, सुधीर गुट्टे, गटसमन्वयक जगन्नाथ लापशेटवार, केंद्रप्रमुख अशोक पुप्पूलवाड आदींची उपस्थिती होती़ या कार्यक्रमात केंद्रस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार एस़ आऱ डुमलवाड (शिरूर), एल़ के़ वडमिले (बितनाळ) यांना तर गुणी शिक्षक पुरस्कार पी़ बी़ गीते (बितनाळ), व्ही़ व्ही़ कळसकर, एऩ पी़ बाचेवाड (बोथी) यांना प्रदान करण्यात आला़
आदर्श शिक्षक पुरस्कार रखडले
By admin | Updated: September 12, 2014 00:06 IST