सेनगाव : शैक्षणिक वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी शाळा बंद ठेवून खासगी लग्न समारंभाच्या कार्यक्रमाला भाड्याने दिल्याचा प्रकार तालुक्यातील खुडज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडला होता. या प्रकरणी कारवाई करण्यासाठी तालुका शिक्षण विभागाने शिक्षणाधिकाऱ्यांना अहवाल पाठविला असून, शाळेतील लग्न मुख्याध्यापकास चांगलेच अंगलट येणार आहे. शाळा सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी १७ जून रोजी शाळेला सुट्टी देवून शाळा चक्क खासगी कार्यक्रमासाठी भाड्याने दिल्याचा प्रकार तालुक्यातील खुडज येथील जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळेत घडला होता. हा प्रकार ‘लोकमत’ ने चव्हाट्यावर आणल्यानंतर शिक्षण विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. शाळेला सुट्टी देऊन खासगी कार्यक्रमासाठी शाळा इमारत वापरण्यासाठी दिल्याचा प्रकरणाची विस्तार अधिकारी यु. के. टारफे, केंद्र प्रमुख यांच्या मार्फत चौकशी करण्यात आली. सदर चौकशीत शाळेत विवाह सोहळा थाटला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी संबंधित मुख्याध्यापकाला जबाबदार धरण्यात आले असून, मुख्याध्यापकावर कारवाई करण्यासाठी येथील गटशिक्षणाधिकारी पातळे यांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे कारवाई प्रस्तावित केली आहे. तशी माहिती गटशिक्षणाधिकारी पातळे यांनी दिली. एकंदर शाळा बंद ठेवून खासगी कार्यक्रमासाठी शाळा इमारत देण्याचे प्रकरण मुख्याध्यापकांच्या अंगलट येणार असल्याचे दिसते. (वार्ताहर)
मुख्याध्यापकावर होणार कारवाई
By admin | Updated: June 25, 2014 00:40 IST