भोकरदन : परिसरात गुरूवारी वनविभागाच्या भरारी पथकाने अचानक छापे मारून लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टर्सवर कारवाई करीत ते ताब्यात घेतले. त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून सुमारे ९ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामुळे लाकडाचा अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे़भोकरदन तालुक्यात कुऱ्हाडबंदी असूनही अनेक महिन्यांपासून अवैध वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे. वृक्ष तोडीमुळे जंगल, शेत जमीन परिसर भकास होत आहे. त्याकडे पोलिस व महसूल विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे तसेच हातमिळवणीमुळे अवैध लाकुड तोडीचा व्यवसाय राजरोसपणे सुरू होता. २९ डिसेंबर रोजी औरंगाबाद येथील वन विभागाच्या उपवनरक्षक अशोक गिऱ्हेपुंजे यांना गोपीनीय माहिती मिळाली होती. त्यावरून त्यांनी भरारी पथकाला शहरामध्ये तीन ट्रॅक्टरमध्ये लिंंबाचे झाड अवैध तोडून ते आरामशीनवर कटाईसाठी जाणार आहे. भरारी पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी के़जी़ सोनुने, वनपरिमंडळ अधिकारी व्ही़जी़जाधव,वनरक्षक एस़बी़पवार, डी़सी़ जाधव यांनी सापळा रचला व त्यामध्ये ट्रॅक्टर ( एमएच २८ डी- ५८४९) चालक शेख मुजीब अब्दुल हक ट्रॅक्टर (एमएच २१ - डी ४९२) चालक शंकर उखर्डु गिरी ट्रॅक्टर (एमएच २१ - एटी १४१०) चालक अनिल वसंत जाधव यांच्या ताब्यातून ट्रॅक्टरमधील ओल्या लिंबाचे पळस, करंज या जातीचे लाकूड अवैधरित्या वाहतूक करीत असताना पकडले. ट्रॅक्टरसह ९ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे़वनपरिक्षेत्र अधिकारी के़जी़ सोनुने म्हणाले की, भोकरदन व जाफराबाद तालुक्यात कोठेही अवैध वृक्षतोड करण्यात येत असल्यास संबंधितांविरूध्द वनविभागाच्या वतीने कठोर कारवाई केली जाईल. वृक्षतोडीमुळे पर्जन्यमान कमी होत आहे. शिवाय वन्यप्राण्यांना सुध्दा त्याचा मोठा त्रास होत आहे.
लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर्सवर कारवाई
By admin | Updated: December 29, 2016 23:11 IST