औरंगाबाद : आचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव यांचा ४४ वा जन्मदिवस सोमवारी भक्तिभावात साजरा करण्यात आला.आचार्य गुप्तीनंदीजी हे चातुर्मासानिमित्त राजाबाजार येथील खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिरात ससंघ वास्तव्यास आहेत. पहाटे पाच वाजेपासून भाविकांनी त्यांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. दुपारी आचार्यश्रींची शोभायात्रा काढण्यात आली. राजाबाजार जैन मंदिर, किराणा चावडी, पानदरिबामार्गे अग्रसेन भवन येथे शोभायात्रा विसर्जित करण्यात आली. याठिकाणी जन्मदिवसानिमित्त भव्य मंडप उभारण्यात आला होता. आचार्यश्रींचे आगमन होताच ‘जयकार गुरुदेव का’च्या घोषणा देण्यात आल्या. सुमतीसागर पाठशाळेच्या विद्यार्थ्यांनी ४४ व्या जन्मदिवसाचे औचित्य साधून ४४ प्रकारची पूजा सामग्री आचार्यश्रींच्या चरणी समर्पित केली. मुलांनी सांस्कृतिक नृत्य सादर केले. नागपूर येथील नितीन नकाते, राजेश जैन यांच्या परिवाराच्या वतीने आचार्य गुप्तीनंदी गुरुदेव यांचे पादप्रक्षालन व पूजा करण्यात आली. गुरुदेवांना पिंच्छी देण्याचा मान दिल्ली येथील मोहित जैन यांना, शास्त्र प्रदान करण्याचा मान संतोष कासलीवाल यांना, तर आरती करण्याचा मान पुष्पा पाटणी यांना मिळाला. मुनीश्री सुयेश गुप्तीजी, मुनीश्री चंद्रगुप्तीजी, आर्यिका सुमती, आर्यिका सुनीती माताजी, पंचायतचे विश्वस्त चांदमल चांदीवाल, संजय साहुजी, नितीन नकाते आदींनी आचार्यश्रींना विनयांजली समर्पित केली. नरेंद्र गंगवाल यांच्या परिवारातर्फे शालेय विद्यार्थ्यांना शंभर दप्तरांचे वाटप करण्यात आले. ‘तेरा पंथकी समीक्षा’ या पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले, अशी माहिती चातुर्मास समितीचे अध्यक्ष ललित पाटणी, अशोक अजमेरा, डॉ. रमेश बडजाते, एम. आर. बडजाते, विनोद लोहाडे, दिलीप कासलीवाल यांनी दिली.मानव सेवा हा आमचा परम धर्म व कर्तव्य आहे. सेवा केल्याने मन पवित्र होत असते. एक-दुसऱ्यांविषयी प्रेम, वात्सल्य, आदर करणे महत्त्वाचे असल्याचे आचार्य गुप्तीनंदी गुरुदेव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. धीरज पाटणी परिवाराच्या वतीने प्रसादीचे वाटप करण्यात आले.
आचार्य गुप्तीनंदीजी यांचा जन्मदिवस भक्तिभावात
By admin | Updated: August 2, 2016 00:27 IST