हिंगोली : दलालांचा आधार घेतल्याशिवाय बँका कर्जच देत नसल्याच्या तक्रारींमुळे बँकांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी आदेशित केले.जिल्हा कचेरीतून सभागृहात झालेल्या बैठकीस जि. प. अध्यक्षा लक्ष्मीबाई यशवंते, आ. जयप्रकाश मुंदडा, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. रामराव वडकुते, सीईओ मधुकर आर्दड, अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ९६८.५० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करावयाचे असल्याचे सांगण्यात आले. सध्या १३ हजार शेतकऱ्यांचे ६८ कोटींचे पुनर्गठन झाले. केवळ १७ टक्के शेतकऱ्यांना कर्ज वाटले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँक अपेक्षित कर्जवाटप करीत नसल्याचा मुद्दा समोर आला. या दोन्ही बँकेची आर्थिकस्थिती चांगली नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. मात्र ती चांगली असल्याचे समोर असल्याचे कर्ज वाटपाचा आदेश दिला. राष्ट्रीयीकृत सर्वच बँकांची कर्जवाटपाचा टक्का कमी आहे. त्यांनी व इतर सर्व बँकांनी २० जूनपर्यंत कर्जवाटप पूर्ण न केल्यास कठोर कारवाईचा आदेशही त्यांनी दिला.पीककर्जासाठी सर्च रिपोर्टचा मुद्दा आ. मुंदडा यांनी उपस्थित केला. त्यावेळी कुणीही फेरफार अथवा सर्च रिपोर्ट मागू नये. असे आदेशित केले तर दलालांच्या सुळसुळाटाबाबत आ. मुटकुळे यांनी आरोप केला होता. तर आ. वडकुते यांनी सेनगावात २०० शेतकऱ्यांच्या सातबारावर बोजा चढवूनही कर्ज वाटप झाले नसल्याचा आरोप केला.हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. अॅक्सीस, आयसीआयसीआय आदी खाजगी बँका पीककर्ज अजिबात देत नाहीत, अशीही सर्वात्रिक तक्रार होती. त्यावरही पालकमंत्र्यांनी या बँका येथे व्यवसाय करत असतील तर त्यांनी कर्ज दिलेच पाहिजे, असे ठासून सांगितले. अन्यथा परवाना रद्द करू, असे बजावले.आमदार घेणार मेळावेपीककर्ज वाटपाचे काम गतिमान होण्यासाठी सर्व आमदार तालुक्याला बँक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कर्जमेळावे घेतील, असे पालकमंत्र्यांनी जाहीर केले. यापूर्वी त्यांनी चावडी बैठका घेतील, असे सांगितले होते. तसा प्रकार यावेळी झाला तर शेतकऱ्यांनी कर्ज मिळणे दुरापास्तच आहे. कारण दुष्काळ मदतीचे २० ते २५ कोटीचे वाटप अजून बाकी आहे.(जिल्हा प्रतिनिधी)
बँकांवर राहणार एसीबीची नजर
By admin | Updated: June 10, 2016 23:42 IST