अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ कला व वाणिज्य महाविद्यालयातील एम. कॉम प्रथम वर्षाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या १५ विद्यार्थ्यांचे गुणपत्रक प्राप्त न झाल्याने व पुढील वर्षाची प्रवेशाची मुदत संपल्याने या पंधरा विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. वारंवार विद्यापीठाकडे पाठपुरावा करूनही उडवाउडवी होत असल्याने हे विद्यार्थी अस्वस्थ आहेत. स्वामी रामानंद तीर्थ कला व वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या एम. कॉम. या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयाकडे साठ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची मान्यता आहे. कुलसचिवांनी महाविद्यालयास १५ जादा जागा भरण्यास मान्यता दिली होती. त्या प्रमाणे जास्तीच्या पंधरा विद्यार्थ्यांना प्रत्येकी १६ हजार रुपये दंडाची रक्कम धरून विद्यापीठाने प्रवेश दिले होते. नियमाप्रमाणे एप्रिल-मे महिन्यात शैक्षणिक वर्षातील परीक्षाही झाली. मात्र येथून पुढे या विद्यार्थ्यांच्या भविष्याचे प्रश्नचिन्ह उभे राहिले. या पंधरा विद्यार्थ्यांचे निकालानंतर गुणपत्रकच प्राप्त झाले नाहीत. या संदर्भात महाविद्यालय प्रशासनाने सातत्याने विद्यापीठ प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र प्रत्येक वेळी नवेच कारण दाखवून टाळाटाळ करण्यात आली. स्वत: कुलसचिव यांच्या पत्राने पंधरा विद्यार्थ्यांच्या प्रवेशास मान्यता देण्यात आली. त्यांच्याकडून दंडासहित प्रत्येकी १६ हजार रूपयांची रक्कमही वसूल झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)
अंबाजोगाईत १५ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधातरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2016 01:03 IST