लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील मुख्य रस्त्यांसह छोटे-मोठे रस्त्यांवर खड्डेच खड्डे असल्याचे समोर आले आहे. लोकमतने मंगळवारी शहरातील रस्त्यांची पाहणी केली असता जवळपास ९० टक्के रस्ते खड्डेमय असल्याचे दिसून आले. या खड्डयांतून मार्ग काढताना पादचारी, वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. तसेच छोटे-मोठे अपघातही घडत असल्याचे दिसून आले. याच्या दुरूस्तीकडे नगर पालिका, सा.बां. विभागाचे सर्रास दुर्लक्ष होत आहे.बीड शहरातून सोलापूर-धुळे हा राष्ट्रीय महामार्ग जातो. त्यामुळे छोट्या-मोठ्या वाहनांसह अवजड वाहनांची नेहमीच वर्दळ असते. परंतु या मार्गावर शहरात प्रवेश करण्यापूर्वीच खड्ड्यांचा सामना करावा लागतो. बार्शी नाका ते जालना रोडच्या बायपास रोडपर्यंत येण्यासाठी अवजड वाहनांना तब्बल २१ मिनिटे लागतात. जादा वेळ लागण्यास केवळ खड्डेच कारणीभूत असल्याचे दिसून आले. यात भरीस भर म्हणून महामार्ग अतिक्रमणांमूळे अरूंद झाला आहे. त्यामुळेही वाहतूक कोंडी होत असून वाहनधारकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. राष्ट्रीय महामार्गावर मोंढा नाका परिसरात फोन वायर व पाईपलाईन दुरूस्तीच्या नावाखाली मागील पंधरा दिवसांपासून भला मोठा खड्डा खोदला आहे. या खड्ड्यात रात्रीच्यावेळी दुचाकीस्वार पडल्याचेही उदाहरणे आहेत. परंतु संबंधित विभागाने अद्यापही हा खड्डा पूर्णपणे दुरूस्त केलेला नाही. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय, शिवाजीनगर पोलीस ठाणे, राष्ट्रवादी भवन व बार्शी नाका परिसरात मोठमोठे खड्डे असल्याचे पहावयास मिळाले. या खड्ड्यांमुळे वाहनांची स्पीड कमी होत होती. त्यामुळे त्यांना पुढे जाण्यास कमी वेळ लागत असल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहनधारकांमधून संताप व्यक्त होत आहे. हे खड्डे बुजवून होणारे अपघात टाळावेत. तसेच पादचारी व वाहनधारकांचा त्रास कमी करावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
९० टक्के रस्ते खड्डेमय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:51 IST