उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२२ ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासूनच गल्लीपासून जिल्ह्यापर्यंतच्या पदाधिकारी, नेतेमंडळींनी ग्रामपंचायती आपल्याच पक्षाच्या ताब्यात ठेवण्यासाठी धावपळ सुरू केली होती़ उमेदवारी अर्ज भरेपर्यंत आणि मागे घेण्याच्या क्षणापर्यंत अनेक गावातील पक्षांतर्गत कलह, गट-तट व बंडखोरी प्रकर्षाने समोर आली. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ४३ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या होत्या़ उर्वरित ३७९ ग्रामपंचायतीच्या सदस्य निवडीसाठी मंगळवारी तब्बल ८०़५४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़ यात जिल्ह्यातील ५ लाख ५६ हजार ८१८ मतदारांपैकी ४ लाख ४८ हजार ४९५ मतदारांनी मतदान केले आहे़ सर्वच मतदान केंद्रावरील चोख पोलीस बंदोबस्त व निवडणूक विभागाच्या नियोजनामुळे जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली़ निवडणुकीत उतरलेल्या ६ हजार ७५५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे़ सर्वाधिक ८६़१७ टक्के मतदान परंडा तालुक्यात झाले़ तर सर्वात कमी मतदान उमरगा तालुक्यात ७४़३० टक्के झाले़ तर उस्मानाबाद तालुक्यात ८०़६० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़ जिल्ह्यातील २ लाख ६३०४ महिला व २ लाख ४२ हजार १९१ पुरूष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़ गुरूवारी होणाऱ्या मतमोजणीकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे़
३७९ ग्रामपंचायतींसाठी ८०.५४% मतदान
By admin | Updated: August 5, 2015 00:42 IST