नांदेड : जिल्हा पोलिस दलातील ७२ जागांसाठी रविवारी शहरातील यशवंत महाविद्यालयात लेखी परीक्षा घेण्यात आली़ या परीक्षेसाठी ८०२ उमेदवारांना बोलाविण्यात आले होते़ शांततेच्या वातावरणात ही परीक्षा पार पडली़७२ जागांसाठी ६ जूनपासून पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती़ प्रथम पुुरुष उमेदवार व त्यानंतर महिला उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी, उंची, छाती आदी चाचण्या घेण्यात आल्या़ त्यानंतर ५ किलोमीटर व १०० मीटर धावण्याची स्पर्धा घेण्यात आली़ भरतीसाठी १९८५ जणांनी नोंदणी केली होती़ त्यात गैरहजर व कागदपत्र पडताळणीत मूळ कागदपत्र नसलेल्यांना ९ जून रोजी पुन्हा संधी देण्यात आली होती़ या सर्व चाचण्यांमधून लेखी परीक्षेसाठी ८०२ उमेदवार पात्र ठरले होते़ त्यांची रविवारी यशवंत महाविद्यालयात लेखी परीक्षा घेण्यात आली़परीक्षेसाठी या ठिकाणी १७ हॉलमध्ये व्यवस्था करण्यात आली होती़ दुपारी साडेतीन ते पाच वाजेपर्यंत ही परीक्षा घेण्यात आली़ प्रत्येक विद्यार्थ्यासाठी परीक्षेसाठी स्वतंत्र बाकाची व्यवस्था करण्यात आली होती़ तसेच सदर परीक्षा बंदोबस्ताकरिता ५० अधिकारी २०० कर्मचारी तैनात करण्यात आले होते़ त्यासाठी एक दिवस अगोदर रंगीत तालीमही घेण्यात आली होती़ रविवारी अतिशय शांततेच्या वातावरणात ही परीक्षा पार पडली़आता लेखी परीक्षेनंतर निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात येणार आहे़परीक्षास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले, सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अमोघ गांवकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विजय कबाडे, दत्तात्रय कांबळे, अशोक विरकर यांची उपस्थिती होती़ या सर्व भरती प्रक्रियेवर सीसी- टीव्हीचा वॉच ठेवण्यात आला होता़(प्रतिनिधी)
८०० उमेदवारांची लेखी परीक्षा
By admin | Updated: June 16, 2014 00:26 IST