औरंगाबाद : पवित्र हज यात्रेला यंदा महाराष्ट्रातून ७ हजार ९६५ नागरिक जाणार आहेत. केंद्रीय हज कमिटीने बुधवारी देशातील यात्रेकरूंच्या उड्डाणांचे वेळापत्रक जाहीर केले. महाराष्ट्रातून मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद विमानतळांवरून हज यात्रेकरू रवाना होणार आहेत. १२ सप्टेंबर रोजी ईद-उल-अज्हा साजरी करण्यात येणार आहे. त्यापूर्वी हज यात्रा करण्यात येते.सौदी अरेबिया सरकारने मागील काही वर्षांपासून भारताच्या कोट्यात बरीच कपात केली आहे. त्यामुळे हज यात्रेकरूंची संख्या बरीच घटली आहे. यंदा महाराष्ट्राच्या कोट्यानुसार ७ हजार ४८१ यात्रेकरूहजला जाणार आहेत. नागपूर विमानतळावरून छत्तीसगड येथील यात्रेकरूहजला जातात. त्यामुळे महाराष्ट्रातून हजला जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या ७ हजार ९६५ वर गेली आहे. मुंबई विमानतळावरून ४ हजार २९ यात्रेकरूजातील. दररोज ३४० यात्रेकरू रवाना होतील. एकूण १२ विमानाद्वारे यात्रेकरू ९ सप्टेंबरपर्यंत जातील. नागपूर विमानतळावरून १६०९ यात्रेकरू ५ विमानांद्वारे दररोज रवाना होणार आहेत. २५ आॅगस्ट ते २८ आॅगस्टपर्यंत यात्रेकरूरवाना होणार आहेत. औरंगाबादेतून २ हजार ३२७ यात्रेकरू रवाना होणार आहेत. ३० आॅगस्टपासून यात्रेकरू रवाना होण्याची प्रक्रिया सुरू होईल. एकूण ८ विमाने यात्रेकरूंना नेतील. ९ सप्टेंबरपर्यंत यात्रेकरूंच्या जाण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. मराठवाड्यातील यात्रेकरूंना पूर्वी मुंबईहून हजला जावे लागत होते. एका यात्रेकरूसोबत किमान आठ ते दहा नातेवाईक सोबत असत. मुंबईपर्यंत ये-जा करणे आणि एक दिवसाचा मुक्काम केल्यास हजारो रुपये नागरिकांना खर्च करावे लागत होते. औरंगाबादेतून थेट विमानसेवा सुरू करावी अशी मागणी मराठवाड्यातील नागरिकांची होती. मागील काही वर्षांपासून ही सेवा अखंडितपणे सुरू आहे.
महाराष्ट्रातून ७,९६५ भाविक हजला जाणार
By admin | Updated: August 6, 2016 00:23 IST