हिंगोली : शहरातील रामलीला मैदानावर आयोजित धान्य व फळ महोत्सवात ७० स्टॉल उभारण्यात आले आहेत. बियाण्यांपासून अन्नधान्य, आंबे, गृहोपयोगी साहित्य, मसाल्याचे पदार्थ, डाळीपर्यंत आदी साहित्य खरेदी-विक्री आले आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र शासन कृषी व पणन विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व्यवस्थापन यंत्रणा आत्माच्या संयुक्त विद्यमाने धान्य व फळे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रामलीला मैदानावर १३ व १४ मे रोजी होणार्या या मोहत्वाचे उद्घाटन जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही. बनसोडे, जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर, तोंडापूर कृषीविज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक पी. पी. शेळके उपस्थित होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.के. पवार, आत्माचे प्रकल्प संचालक पी.के. उगले, उपविभागीय कृषी अधिकारी बी.एस. कच्छवे, उपप्रकल्प संचालक एम.डी. तीर्थकर, पणन अधिकारी दिनेश डागा, तालुका कृषी अधिकारी राधेशाम शर्मा उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी पोयाम यांनी धान्य व फळे महोत्सव हा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले. अशाप्रकारचे महोत्सव प्रत्येक हंगामात किंवा महिन्याच्या दुसर्या रविवारी भरविण्यात यावेत. महोत्सवासाठी शासनाकडून भाडे तत्वावर जागा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत त्यासाठी विविध संस्थेने सहकार्य करण्याचे आवाहन पी. व्ही. बनसोडे यांनी केले. पी.के. उगले यांनी शेतकर्यामध्ये बाजार व्यवस्थापनाचे कौशल्य निर्माण करून ग्राहकांना स्वच्छ, निर्भळ व किफायशीर दरात शेतीमाल, फळे व भाजीपाला उपलब्ध करण्याचा प्रयत्न हा महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे सांगितले. सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा असल्याने बाजारात बियाणे चढ्या दराने विक्री होण्याची शक्यता आहे. म्हणून उत्पादकांनी या महोत्सवात विक्रीसाठी आलेल्या स्टॉलवर किफायतशीर दामामध्ये सोयाबीनचे बियाणे खरेदी करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. (प्रतिनिधी) दिवसभरात झाली २५० ते ३०० क्विंटलची खरेदी महोत्सवात शेतकरी व शेतकरी गटांनी विविध प्रकारचे साहित्य विक्रीसाठी ठेवले आहे. त्यात फळांमध्ये आंबा, केळी, चिकू, भाजीपाला, निवडलेले धान्य, प्रक्रिया केलेला कृषीमाल, डाळी, मसाल्याचे पदार्थ, गुळ, हळद, स्वीट कॉर्न, सरबत, लोणचे, पापड, विविध रोपे, कलमे आदींचा समावेश आहे. तसेच आगामी खरीप हंगामात लागणारे बियाणे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणले आहे. प्रामुख्याने सोयाबीनच्या बियाण्यांचा समावेश आहे. एकूण ७० स्टॉलवर जवळपास २५० ते ३५० क्विंटल शेतीमाल विक्रीसाठी आला आहे. पहिल्याच दिवशी मालाच्या खरेदी-विक्रीतून पंधरा लाखांची उलाढाल झाली.
धान्य महोत्सवात ७० स्टॉल
By admin | Updated: May 14, 2014 01:00 IST