लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : वीज ग्राहकांना ग्राहकाभिमुख सेवा देण्यात सातत्याने प्रयत्नरत असलेल्या महावितरण कंपनीने आता एक पाऊल पुढे टाकत मीटर रीडिंग एजन्सीने योग्य रीडिंग घेतले आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी नांदेड परिमंडळाच्या वतीने नांदेडसह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात क्रॉसचेक रीडिंगला सुरुवात केली आहे. या मोहिमेत आजपर्यंत ७ हजार ६४७ रीडिंगची फेरतपासणी करण्यात आली असून त्यामध्ये ३ हजार ४१३ रीडिंग सदोष असल्याचे निदर्शनास आले आहे.रीडिंग एजन्सीकडून चुकीचे व अनियमित बिलिंग होत असल्यामुळे महावितरणला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे कंपनीच्या आर्थिक नुकसानीसोबतच वीज ग्राहकांनांही चुकीच्या बिलांच्या समस्येला तोंड द्यावे लागते. अशा प्रसंगी वीजग्राहक आणि महावितरणचे प्रशासन यामध्ये असलेल्या चांगल्या संबंधांना तडे जातात. त्यामुळे नांदेड परिमंडळाच्या वतीने नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात क्रॉसचेक रिडींगला सुरुवात केली आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांसह संबंधित शाखा कार्यालय तसेच विभागीय कार्यालयातील अभियंत्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर तिन्ही जिल्ह्यांचे अधीक्षक अभियंता यांच्यासह मुख्य अभियंताही स्वत: या मोहिमेत सहभागी झालेले आहेत. १९ जूनपासून सुरू करण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत नांदेड जिल्ह्यामध्ये एजन्सीने १ लाख ७३ हजार ६७४ वीजग्राहकांचे मीटर रीडिंग घेतले होते़ यापैकी ६ हजार ३७० वीजग्राहकांच्या मीटर रीडिंगची फेर तपासणी करण्यात आली़ यातील २ हजार ९२२ रीडिंग सदोष आढळून आल्या. त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील ५० हजार ९१६ ग्राहकांची रीडिंग एजन्सीने घेतली़ त्यापैकी ५०४ रीडिंगची फेरतपासणी केली असता ३१८ रीडिंग चुकीच्या घेतल्याचे उघड झाले आहे. परभणी जिल्ह्यामध्ये ६९ हजार ५५८ रीडिंग घेतल्या़ यापैकी ७७३ रीडिंगची फेरतपासणी करण्यात आली. यामध्ये १७३ रीडिंग सदोष असल्याचे निदर्शनास आल्या.औरंगाबाद प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी रिडींगसंदर्भात दोषी आढळणाऱ्या एजन्सीवर करारानुसार दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. चुकीच्या रीडिंग पुन्हा दुरुस्त करुन वीजग्राहकांना वाटप करण्यात येत असून याकामी वीजग्राहकांनी महावितरणला सहकार्य करण्याची भूमिका घेऊन आपली सुधारित बिले त्वरित भरावीत, असे आवाहन महावितरणने केले आहे़
७ हजार ६४७ मीटरची महावितरणकडून फेरतपासणी
By admin | Updated: July 8, 2017 00:28 IST