औरंगाबाद : जिल्हा परिषदेंतर्गत वस्ती शाळेवर कार्यरत निमशिक्षकांना वेतनश्रेणी देण्यासाठी बुधवारपासून तालुकावार शिबिरे घेण्यास प्रारंभ झाला. पैठण तालुक्यात आयोजित पहिल्या शिबिरात ५४ निमशिक्षकांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील ६८१ निमशिक्षकांना लवकरच सहायक शिक्षकपदी पदोन्नतीसह वेतनश्रेणीही मिळणार आहे. नितीन उपासनी यांनी सांगितले की, तालुकावार शिबिरे घेऊन सर्व निमशिक्षकांची शैक्षणिक पात्रता व संबंधित कागदपत्रे तपासली जातील. पैठण येथे शिबिरात दोन शिक्षकांच्या कागदपत्रांमध्ये तफावत आढळून आली. सर्व तालुक्यांची तपासणी झाल्यानंतर जिल्हास्तरावर एक शिबीर घेऊन कारवाई पूर्ण केली जाईल. शिक्षण विभागाने सुरू केलेल्या प्रक्रियेचे समितीचे दिलीप ढाकणे, शालिकराम खिस्ते, शिवाजी एरंडे, बाळकृष्ण विखणकर, के. सी. गाडेकर, संतोष जाधव, संजय कुलकर्णी आदींनी स्वागत केले आहे. सन २००१ पासून हे निमशिक्षक वस्ती शाळांवर कार्यरत आहेत. १ मार्च २०१० रोजी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी निर्णय घेऊन पात्र डी.टी.एड.धारक निमशिक्षकांना सहायक शिक्षकपदी पदोन्नती व वेतनश्रेणी देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयाची अंमलबजावणी जिल्हा परिषदेने अद्याप केली नव्हती. या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी मंगळवारी शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने केली होती. त्यानुसार शिक्षणाधिकार्यांनी त्वरित कारवाई सुरू करण्याचे आश्वासन देत बुधवारी पहिले शिबीरही घेतले.
६८१ निमशिक्षकांना मिळणार वेतनश्रेणी
By admin | Updated: May 8, 2014 00:27 IST