औरंगाबाद, दि. 9 - शेतक-यांसाठी शासनाकडून आलेला कोट्यवधी रुपयांच्या निधीतील ६६ लाखाचा अपहार करणा-या लिपीकाला उस्मानपुरा पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. सुनील गहेनाजी जाधव(सुरेवाडी)असे अटक केलेल्या लिपीकाचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना उस्मानपुरा पोलिसांनी सांगितले की, शासनानाकडून शेतक-यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजना राबविण्याची जबाबदारी प्रकल्प संचालक कृषी विभाग यांच्याकडे असते. शहानुरवाडी येथे कृषी विभागाच्या प्रकल्प संचालक यांच्या कार्यालयांतर्गत आत्मा कार्यालय आहे. या कार्यालयात जून २०१२ ते जून २०१७ या कालावधीत आरोपी लेखापाल-नि-लिपीकपदी कार्यरत होता. नोव्हेंबर २०१६मध्ये आरोपीची बदली झाली. त्यांच्या जागेवर रूजू झालेले वरिष्ठ लिपीक के.जी. पाटील यांच्याकडे त्यांच्या कार्यालयाचे दोन बँक अकाऊंटची माहिती, पासबुक, कॅशबुक,चेकबुक, व्हाऊचर फाईल वारंवार मागणी केल्यानंतरही ते देत नव्हते. यामुळे त्यांनी काही दिवसापूर्वी बँकेकडून दोन्ही खात्याचे स्टेटमेंटची माहिती घेतली. बँकेकडून मिळालेल्या स्टेटमेंटमध्ये आरोपीने एका खात्यात दहा लाख रुपये जमा केल्याचे आढळले. आरोपी जाधवने खात्यात जमा केलेली रक्कम बेकायदेशीर असल्याचे समजताच त्यांनी ही बाब तात्काळ नव्याने रुजू झालेले प्रकल्प संचालक आणि कृषी आयुक्त यांना कळविली. दरम्यान ही बाब गांभीयाने घेत कृषी आयुक्तांनी दोन दिवसापूर्वी प्रकल्प संचालक कार्यालयात जाऊन याप्रकरणाची माहिती घेतली आणि याप्रकरणी तात्काळ गुन्हे नोंदविण्याचे आदेश प्रकल्प संचालकांना दिले. आदेश मिळताच रेणापुरकर यांनी मंगळवारी रात्री याप्रकरणी फिर्याद नोंदवून आरोपी जाधव याने ६६ लाख १९ हजार रुपयांचा अपहार केल्याचे नमूद केले. तक्रार प्राप्त होताच पोलीस निरीक्षक सतीशकुमार टाक, पोलीस उपनिरीक्षक कल्याण शेळके आणि कर्मचा-यांनी रात्रीच जाधव यास त्याच्या घरातून ताब्यात घेतले.
कृषी विभागात ६६ लाखाचा घोटाळा, कॅशिअर लिपिक गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 17:23 IST