उस्मानाबाद : ग्रामीण भागातील पाणीटंचाई लक्षात घेवून शासनाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेला आता गती येण्यास सुरूवात झाली आहे. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून २११ गावांच्या योजनांचा कृतीआराखडा तयार करण्यात आला असून सध्या ६१ गावांमध्ये पाणीपुरवठ्याच्या कामांना सुरूवात करण्यात आली आहे. या विभागाला २०१४-२०१५ मध्ये ४२ गावांतील योजनांची कामे मार्गी लावण्याचे उद्दिष्ट आहे.राष्ट्रीय पेयजल योजनेला लोकवाटा आणि हागणदारीमुक्तीच्या अटीमुळे सुरूवातीचे एक ते दोन वर्ष गती येत नव्हती. वारंवार सूचना देवूनही योजनेला गती येत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर शासनाने लोकवाटा जमा करण्याची अट रद्द करून हागणदारीमुक्तीची अटही काहीप्रमाणात सैैल केली. त्यामुळे आता या योजनेच्या कामांना गती येण्यास सुरूवात केली आहे. पाणीपुरवठा विभागाकडून जिल्हाभरातील २११ गावांतील योजनांचा कृतीआराखडा तयार केला आहे. या योजनांच्या खर्चाचे अंदाजपत्रक ९० कोटीचे आहे. त्यानुसार प्रशासनाला चालू वर्षी किमान ४२ योजनांची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु, पाण्याची टंचाई लक्षात घेता प्रशासनाने उद्दिष्टापेक्षा अधिक कामे हाती घेतील आहेत. सध्या ६१ कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, उद्दिष्टापेक्षा जास्तीची कामे सुरू असली तरी भविष्यात उद्भवणारी पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाने टंचाईग्रस्त गावांतील पाणीपुरवठा योजनांना प्राधान्य देवून कामे तातडीने सुरू करण्याची गरज व्यक्त होत आहे. असे झाल्यास टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर वा अधिग्रहणावर होणारा खर्च टळणार असून ग्रामस्थांची पायपीटही थांबण्यास मदत होईल. (प्रतिनिधी)
पेयजल योजनेअंतर्गत ६१ कामांना सुरूवात
By admin | Updated: November 14, 2014 00:53 IST