औरंगाबाद : एका २४ वर्षीय तरुणीला पे्रमाच्या जाळ्यात ओढून तिच्याकडून पैसे उकळणाऱ्या दोघांना हर्सूल पोलिसांनी शनिवारी अटक केली होती. रविवारी पोलिसांनी त्यांच्याकडून ५६ हजार रुपये हस्तगत केले. दरम्यान आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अजित जाधव (रा. जाधव जवळा, ता. केज, जि. बीड, ह.मु. पुणे) व गणेश फाटक (रा. बोरगाव, ता. केज, ह.मु. पुणे) अशी या भामट्यांची नावे आहेत. सहायक फौजदार विठ्ठल जवखेडे यांनी सांगितले की, अजित हा अकरावी, बारावीला औरंगाबादमध्ये शिकायला होता. नंतर तो पुण्यात स्थायिक झाला. दरम्यान त्याने त्यावेळच्या वर्गमैत्रिणीला फेसबुकवरून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिनेही त्याच्यावर जिवापाड प्रेम केले. पुढे अजितने तिच्याकडून वेगवेगळी कारणे सांगून तब्बल ५६ हजार रुपये उकळले. प्रियकराने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर तिने हर्सूल ठाण्यात धाव घेतली होती. गुन्हा नोंदविल्यावर दहा दिवसांत पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. आरोपींना रविवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रेयसीकडून उकळलेले ५६ हजार रुपये जप्त
By admin | Updated: December 28, 2015 00:25 IST