उस्मानाबाद : मागील अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी रात्री लोहारा परिसर वगळता जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला़ उस्मानाबाद, परंडा, वाशी परिसरात दिलासादायक हजेरी लावली. रविवारी रात्रीच्या सुमारास उस्मानाबाद व कळंब तालुक्याच्या बहुतांश भागात पावसाने दुसऱ्या दिवशीही हजेरी लावली होती़ तर यंदाच्या पावसाळ्यात उस्मानाबाद शहर परिसरात प्रथमच तब्बल ५४ मिमी पाऊस झाल्याची नोंद शासकीय दप्तरी झाली आहे़यंदा पावसाळा सुरू होवून तीन महिन्याचा कालावधी लोटला तरी जिल्ह्यात पावसाने अपेक्षित हजेरी लावली नव्हती़ परिणामी खरीप हंगाम वाया गेला होता़ अनेकांनी दुबार पेरणी करूनही हाती उत्पन्न येण्याची आशा मावळली होती़ तर शहरासह ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, जनावरांचा जिल्ह्यातील उपलब्ध चाराही संपला आहे़ या भीषण दुष्काळी परिस्थितीत शनिवारी रात्री लोहारा तालुक्याचा परिसर वगळता जिल्ह्यात बहुतांश भागात पावसाने हजेरी लावल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे़ शनिवारी रात्रीच्या सुमारास उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक २९़२५ मिमी पाऊस झाला़ तर परंडा परिसरात २०़२० मिमी व वाशी तालुका व परिसरात २१ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ या पावसामुळे उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा परिसरात खोलीकरण करण्यात आलेल्या नाल्यात चांगला पाणीसाठा झाला होता़ तर देवळाली, रूईभर, बेंबळी, वडगाव, खानापूर परिसरातही पावसाने हजेरी लावली़ तर उस्मानाबाद व कळंब तालुका व परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास साधारणत: पाऊण ते एक तास पावसाने हजेरी लावली़ उस्मानाबाद शहरासह खानापूर, शेकापूर, देवळाली, रूईभर परिसरात पाऊस झाला़ तर कळंब शहरासह तालुक्यातील डिकसळ, पिंपळगाव डोळा, मंरूळ, आंदोरा, पाथर्डी, हासेगाव केज, खोंदला, आथर्डी, बहुला, आढाळा परिसरात पावसाने हजरी लावली़ तर बहुतांश भागात ढगाळ वातावरणामुळे पाऊस पडण्याची आशा वर्तविली जात होती़ (प्रतिनिधी)
उस्मानाबादेत ५४ मिमी पाऊस
By admin | Updated: September 6, 2015 23:55 IST