धर्माबाद : तालुक्यातील जारीकोट येथे देशी दारुचे दुकान कायमस्वरुपी बंद करण्याच्या मागणीसाठी ३० जुलै रोजी उत्पादन शुल्क विभाग आणि पंचायत समितीने ठराव घेतला. ठरावाच्या बाजूने ५१७ महिलांनी हात वर केले. टक्केवारी ५१ होते. त्यामुळे बाटली आडवी होणार, असे जाहीर करण्यात आले.मतदानाच्या वेळी प्रत्येक महिलेने मतदान कार्ड, आधारकार्ड दाखवून खात्री पटवून दिली, अशा एकूण ५१७ महिलांनी दारु विक्री बंद करावी, आडवी बाटली करण्यात यावी, यासाठी हात वर केले. ग्रामपंचायतीत मतदान होणार आहे, अशी माहिती उत्पादन शुल्क विभाग धर्माबादचे पी.एन. चिलवंतकर यांनी दिली. घरातील दागदागिने विक्री करुन दारुच्या नशेत पैसे घालण्याचा प्रयत्न अनेकजण करीत आहेत. त्यामुळे महिला संतापल्या आणि त्यांनी दारु विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला. याच मागणीसाठी २४ जुलै रोजी धर्माबाद तहसील कार्यालयावर धरणे धरण्यात आली, ३० जुलै रोजी जारीकोट ग्रामपंचायतने ठराव घेतला. ठरावात महिला मतदारांची पडताळणी करुन घेतली. जारीकोटमध्ये महिलांची संख्या १३२५ असून, दारुबाटली आडवी करण्यासाठी प्रत्येक घरातून महिला बाहेर पडल्या. बॉटल आडवी झालीच पाहिजे, अशा विविध घोषणा महिलांनी दिल्या. काही महिला पती, मुलांच्या भीतीपोटी घराबाहेर पडल्याच नाहीत. यावेळी उत्पादन शुल्क विभाग बिलोलीचे निरीक्षक एस.एस. खंडेराय, डी.एन. चिलवंतकर, डी.एस. घुगे, एम.एस. पठाण, एस.एम. गोदमवार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस.एन. धन्वे, विस्तार अधिकारी एस.एस. जाधव, अशोक मंगनाळे, डी.बी. भोस्कर, सरपंच केशव रामोड, यादव पा. जारीकोटकर, नारायण इबितवार आदींची उपस्थिती होती. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (वार्ताहर)
५१ टक्के महिलांचे मतदान
By admin | Updated: July 31, 2014 00:48 IST