औरंगाबाद : अभियांत्रिकी शिक्षणाच्या ग्लॅमरला उतरती कळा लागल्याचे प्रवेशाअभावी शिल्लक राहिलेल्या जागांवरून स्पष्ट होते. यंदा समुपदेशनच्या फेरीअखेर राज्यात ६१ हजार अभियांत्रिकी प्रथम वर्षाच्या जागा शिल्लक राहिल्या असून, सध्या महाविद्यालये आपल्या स्तरावर विद्यार्थ्यांना प्रवेश देत आहेत. त्यानंतरही सुमारे ५० हजार जागा यंदा शिल्लक राहण्याची शक्यता तंत्रशिक्षण विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. राज्यात अभियांत्रिकीचे शिक्षण देणाऱ्या शासकीय व खाजगी, अशा ३६५ संस्था असून, दीड लाख विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. यासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) तीन फेऱ्यांच्या माध्यमातून प्रवेश देण्यात आले. तिसरी फेरी ही समुपदेशन प्रक्रियेची होती. औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नागपूर, पुणे व मुंबई या सहा ठिकाणी समुपदेशन प्रवेश प्रक्रिया राबविली. त्यानंतरही ६१ हजार जागा शिल्लक राहिल्या. आता महाविद्यालयीन स्तरावर शिल्लक जागांवर प्रवेश देण्यात येत आहेत. असे असले तरी यंदा सुमारे ५० हजार जागा प्रवेशाअभावी शिल्लक राहण्याची शक्यता आहे. मागील दहा वर्षांमध्ये अभियांत्रिकी शिक्षणाला मोठे ग्लॅमर आले होते. त्यामुळे राज्यात अभियांत्रिकी महाविद्यालयांचे पेव फुटले होते. अलीकडे अभियांत्रिकीची पदवी घेतलेले हजारो विद्यार्थी बेरोजगार असून, अनेक जण किरकोळ पगारावर खाजगी कंपन्यांमध्ये नोकरी करीत आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी शिक्षणाकडे असलेला कल कमी झाला आहे.
अभियांत्रिकीच्या ५० हजार जागा शिल्लक
By admin | Updated: August 12, 2014 02:01 IST