औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांनी भ्रष्टाचाराच्या कारणावरून राज्यातील पाच अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या पाच अधिकाऱ्यांमध्ये तीन कार्यकारी अभियंता आणि दोन उपअभियंत्यांचा समावेश आहे. औरंगाबाद दौऱ्यावर पत्रकारांशी बोलताना अतिरिक्त मुख्य सचिव कुलकर्णी यांनीच आज ही माहिती दिली; पण त्याचवेळी कारवाई हे आपले ध्येय नसून राज्यातील रस्त्यांची अवस्था सुधारणे हे आपल्यासमोरचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यकारी अभियंता भगत (अकोला), कार्यकारी अभियंता तवार (बुलडाणा), कार्यकारी अभियंता महाले (रायगड), उपअभियंता शेख जिलानी (आष्टी, जि. बीड) आणि उपअभियंता एस. डी. पाटील (पाटोदा, जि. बीड) या पाच जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. कामाचे तुकडे पाडून त्याचे वाटप करणे, कामातील भ्रष्टाचार, अनियमितता, कामचुकारपणा आदी कारणांमुळे ही कारवाई केली असल्याचे त्यांनी सांगितले. आनंद कुलकर्णी म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी अनेक पावले उचलली जात आहेत. सध्या राज्यात बांधकाम खात्यातील मनुष्यबळाचा अभाव आहे. अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. गेल्या पंधरा वर्षांत पदोन्नत्याच दिल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे तातडीने पदोन्नत्या देऊ ही महत्त्वाची पदे भरणार आहोत. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत राज्यात रस्ते आणि इमारतींचे बांधकाम गुणवत्तापूर्ण सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कामांची तपासणी करण्यासाठी गुणवत्ता नियंत्रण विभाग आहे; परंतु हा विभाग सध्या तेवढा कार्यक्षम नाही. त्यातील असंख्य पदे रिक्त आहेत. त्यामुळे आता या विभागावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. ४लवकरच बदल्यांचा सिझन सुरू होत आहे. त्यात या विभागातील सर्व पदे भरून हा विभाग अधिक सक्षम करण्यात येणार आहे, असेही अप्पर मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांनी सांगितले.
बांधकाम विभागाचे ५ अधिकारी निलंबित
By admin | Updated: April 26, 2015 01:02 IST