गजानन दिवाण, औरंगाबादसलीम अली सरोवरावर पतंगाच्या मांजात अडकलेल्या सात बगळ्यांना सोडविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी एका पक्षीप्रेमीकडून ४५० रुपये घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कॉल जाताच तीन मिनिटांत बाहेर पडणे अपेक्षित असताना फोन घेण्यास टाळाटाळ करून तब्बल अडीच तासांनंतर हे पथक घटनास्थळी धडकले. या प्रकाराने पक्षीप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे. पर्यावरणावर काम करणाऱ्या एका संस्थेचा औरंगाबादप्रमुख हा आपल्या संचालकांना सलीम अली सरोवर दाखविण्यासाठी गुरुवारी सकाळी गेला होता. त्यावेळी तलावाच्या बाजूला असलेल्या झाडावर सात बगळे मांजात अडकल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने आपल्या सहकाऱ्यांसह या बगळ्यांना काढण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, पाण्यातून पलीकडे जाणे शक्य नसल्याने त्याने तातडीने आपल्या मोबाईलवरून आधी १०१ हा क्रमांक डायल केला. मात्र, तो चालतच नसल्याने अग्निशमनच्या २३३४००० वर फोन करून त्याने ही माहिती दिली. येताना बोट घेऊन यावे लागेल, अशी सूचनाही त्याने केली. नंतर कोणीच येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अनेक वेळा त्याने फोन केला. मात्र, प्रतिसाद मिळत नसल्याने मित्राच्या मोबाईलवरून पुन्हा फोन लावण्यात आला. १२.३० वाजता अग्निशमनचे पथक गेटवर धडकले. पक्ष्यांना सोडविण्यासाठी पाण्यातून जाण्याची गरज लक्षात घेऊन बोट आणण्यासाठी हे पथक पुन्हा कार्यालयात गेले. सर्व साहित्यासह हे पथक पुन्हा दुपारी १.३० वाजता आले. तासाभराच्या प्रयत्नानंतर सातही बगळ्यांची सुटका करण्यात आली. तोपर्यंत दोन बगळ्यांनी जागीच जीव सोडला होता. सुटका होताच तीन बगळ्यांनी आकाशात भरारी घेतली.