औरंगाबाद : अमेरिकेचे प्लास्टिक सर्जरी तज्ज्ञ डॉ. राज लाला व डॉ. विजय मोराडिया यांनी मागील पाच दिवसांत ४३९ शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या आणि लायन्सच्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराची शुक्रवारी सांगता झाली. लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद-चिकलठाणा, महात्मा गांधी मिशन मेडिकल रिसर्च सेंटर व केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री स्व. डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ ४० वे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबीर घेण्यात आले. या शिबिराचा समारोप सायंकाळी करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर डॉ.राज लाला, डॉ. विजय मोराडिया, डॉ. ललिता लाला, डॉ.जयशीला मुढेरा, एमजीएमचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. के. सोमाणी, डॉ. अमित नस्नावर, औषधी विक्रेता संघटनेचे मनोहर कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रकल्प प्रमुख दीपक अग्रवाल यांनी सांगितले की, पाच दिवसांच्या या शिबिरात ४३९ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. रुग्णांची संख्या अधिक लक्षात घेऊन शिबिराचा एक दिवस वाढविण्यात आला होता. आज शेवटच्या दिवशी १०१ शस्त्रक्रिया पार पडल्या. लायन्स अध्यक्ष राजेश भारुका यांनी या मानवतेच्या महायज्ञात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या दिलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले. शिबिराचे यशस्वी होणे म्हणजे संघटन शक्तीचा विजय होय, असा उल्लेखही त्यांनी केला. डॉ. राज लाला यांनी या शिबिरासाठी दरवर्षी भारतात येण्याचे आश्वासनही दिले. यानंतर शिबिरात विशेष सहकार्य करणाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कल्याण वाघमारे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन विजयकुमार थानवी व राजेश लुणिया यांनी केले. यावेळी डॉ. उज्ज्वला दहिफळे, डॉ. दत्ता कदम, डॉ. मनोहर अग्रवाल, राजन नाडकर्णी, प्रकाश गोठी,जे. के. जाधव, विनोद चौधरी, भूषण जोशी, विनोद हरकुट, राजेश लहुरीकर, रवींद्र करवंदे, राजेंद्र लोहिया, प्रकाश राठी, रमेश पोकर्णा, संजीव गुप्ता, सुरेश बाफना, ओ. पी. खन्ना, मदनभाई जालानवाला आदींची उपस्थिती होती.
प्लास्टिक सर्जरी शिबिरात ४३९ यशस्वी शस्त्रक्रिया
By admin | Updated: December 18, 2015 23:50 IST