वाळूज महानगर : तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या वाळूजवासीयांना गरवारे उद्योग समूहाने दिलासा दिला आहे. गरवारेतर्फे दररोज ४० हजार लिटर पाण्याचा मोफत पुरवठा केला जात आहे. वाळूज येथे गेल्या चार महिन्यांपासून नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे भर उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरीच्या पाणीपातळीत कमालीची घट झाली आहे. पंचायत समितीतर्फे गेल्या काही दिवसांपासून चार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत हा पाणीपुरवठाही कमी पडत असल्यामुळे अनेक नागरी वसाहतीतील नागरिकांना जारचे विकत पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. या परिसरात बहुतांश गरीब नागरिक वास्तव्यास असल्यामुळे त्यांना जारच्या पाण्याचा खर्च पेलवत नसल्यामुळे त्यांना पाण्यासाठी दूरपर्यंत कडक उन्हात पायपीट करावी लागत आहे. टेंभापुरी प्रकल्पात पाणी नसल्यामुळे पाच कोटींची पेयजल योजना वांझोटी ठरली असून, या योजनेवर झालेला कोट्यवधींचा खर्च पाण्यात गेल्यामुळे नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे. सरपंच सुभाष तुपे, उपसरपंच मनोज जैस्वाल, गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतवणे, केंद्र प्रमुख मिथिन चव्हाण, लालासाहेब चौधरी, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार राऊत, सचिन काकडे, अनिल साळवे, पोपट बनकर, हाफीज पटेल, आदींच्या उपस्थितीत पाणी वाटपाचा उपक्रम सुरू करण्यात आला.
वाळूजवासीयांना दररोज ४० हजार लिटर मोफत पाणी
By admin | Updated: April 14, 2016 01:16 IST