अनुराग पोवळे , नांदेड जिल्ह्यात साथरोगांना आळा बसावा यासाठी जिल्ह्यात मान्सूनपूर्व उपाययोजनांना प्रारंभ करण्यात आला असून आरोग्य विभागाच्या वतीने साथरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कृती योजना हाती घेण्यात आली आहे़ जिल्ह्यातील ३९ गावे साथ जोखीमग्रस्त गावे म्हणून घोषित करण्यात आली आहेत़ या गावांमध्ये अग्रक्रमाने उपाययोजना राबविण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत़ मागील तीन वर्षांच्या काळात जलजन्य साथउद्रेक उद्भवलेली, मोठी यात्रा भरणारी आणि एकच पाण्याचा स्त्रोत असलेल्या गावांचा साथरोगदृष्ट्या जोखीमग्रस्त असलेल्या गावांचा समावेश आहे़ याशिवाय टंचाईग्रस्त, टँकरने पाणीपुरवठा होत असलेली गावे आणि नदीकाठच्या गावांनाही जोखीमग्रस्त समजण्यात येईल, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे़ या गावांची यादी तयार करून जिल्ह्यात ६५ प्राथमिक आरोग्य केंद्रांना आणि ३७७ उपकेंद्रांना देण्यात आली आहे़ साथरोगाच्या दृष्टीने जोखीमग्रस्त असलेल्या गावांमध्ये अर्धापूर तालुक्यातील कलदगाव, माहूर तालुक्यातील अनमाळ व रूई, किनवट तालुक्यातील परोटीतांडा, कुपटी, पांगरपहाड, मांडवी, रिठातांडा, जलधारा व सावरगाव, बिलोली तालुक्यातील अर्जापूर, सगरोळी, बडूर, लघूळ, बेळकोणी खु़, लोहगाव आणि केरूर, भोकर तालुक्यातील थेरबन, नांदेड तालुक्यातील लिंबगाव, जैतापूर, लोहा तालुक्यातील हळदव व मारतळा, हिमायतनगर तालुक्यातील कार्ला, महादापूर, हदगाव तालुक्यातील उंचाडा, गारगव्हाण, पिंपळगाव, राजवाडी, हरडफ, खरबी व हदगाव, उमरी तालुक्यातील जामगाव, उमरी, कंधार तालुक्यातील हटक्याळ, बारूळ, दैठणा, धर्माबाद तालुक्यातील कारेगाव, मुदखेड तालुक्यातील मुदखेड आणि मुखेड तालुक्यातील तुपदाळ या गावांचा समावेश आहे़ मोठी यात्रा भरणार्या गावांनाही आरोग्य विभागाने जोखीमग्रस्तच ठरवले आहे़ त्यात माहूर, माळेगाव, रत्नेश्वरी, दाभड आणि शिकारघाट या गावांचा समावेश आहे़ या जोखीमग्रस्त गावात साथ प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आरोग्य विभागाच्या कर्मचार्याने आठवड्यातून एक भेट द्यावी, पाणीस्त्रोतांचे परीक्षण करावे, परीक्षणात तपासणीचा अहवाल नकारात्मक असेल तर पाणीपुरवठा करणार्या यंत्रणेस सतर्क करण्याचेही आदेश दिले आहेत़ संबंधित ग्रामपंचायतीमध्ये ब्लिचिंग पावडर पुरेशा प्रमाणात असल्याची खात्री करावी, टँकरने होणारा पाणीपुरवठा शुद्ध आहे की नाही याची खात्री करावी, वैद्यकीय अधिकार्यांनी किमान १५ दिवसातून एकदा तरी अशा गावांना भेट देवून माहिती घ्यावी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधीसाठा तपासावा आणि साथउद्रेक उद्भवल्यास उद्रेकाची माहिती मुख्यालयाला कळविण्याबाबत सूचना दिल्या आहेत़ आरोग्य विभागाने साथरोगांना आळा घालण्यासाठी साथरोग नियंत्रण कृती योजना हाती घेतली आहे़ त्यानुसार वैद्यकीय पथकांची स्थापना करणे, प्राथमिक केंद्रांना प्राथमिक आरोग्य केंद्रांना औषधी पुरवठा उपलब्ध करून देणे, नियंत्रण कक्षांंची स्थापना, प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान एका वैद्यकीय अधिकार्यांची उपलब्धता राहणे याची खबरदारी घेण्यात येईल़ डॉ़ दुर्गादास रोडे, जिल्हा साथरोग अधिकारी, जिल्हा परिषद
जिल्ह्यात ३९ गावे जोखीमग्रस्त
By admin | Updated: May 7, 2014 00:45 IST